Congress president: राहुल गांधी यांच्या नकारानंतर काँग्रेस अध्यक्षपदासाठी अशोक गेहलोत यांना प्राधान्य? सूत्रांचा दावा
Sonia Gandhi and Rahul Gandhi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या (Congress President) निवडणुकीची वेळ जवळ येत असतानाही अद्याप उमेदवार निश्चिती होत नसल्याचे दिसते. अध्यक्ष पदासाठी उमेदवार निश्चितीवरुन बुधवारीही (24 ऑगस्ट) मुख्य उमेदवाराच्या नावावरून गोंधळ कायम पाहायला मिळाले. दरम्यान, प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सध्या काँग्रेस  सुप्रीमो असलेल्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना 2024 पर्यंत कायम ठेवण्याचा सल्ला दिला आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना काँग्रेस अध्यक्षपदासाठी आग्रह केला जात होता. मात्र, त्यांनी नकार दिल्याने आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोथ (Ashok Gehlot) यांच्या नावाला पक्षश्रेष्ठींनी पसंती दर्शवल्याचे समजते.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सूत्रांनी दावा केला आहे की, गांधी घराण्याशिवाय कोणीही पक्षाला एकत्र ठेवू शकत नाही. पक्षाचे विघटन होईल. त्यामुळे अशी परिस्थिती टाळण्यासाठी 2024 नंतर प्रियांका गांधी वड्रा यांच्याकडे कमान सोपवावी, यावरही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी जोर दिला.

दरम्यान, "सोनिया गांधींनी अशोक गेहलोत यांच्या नावाबद्दल सूचक निर्देश करत सांगितले की, जर गांधी घराण्यातील कोणालाही अध्यक्ष केले नाही तर गेहलोत यांना अध्यक्ष बनवावे. काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत सोनिया गांधी यांनी मंगळवारी हे वक्तव्य केल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Congress President: राहुल गांधी यांच्या अनिच्छेनंतर काँग्रेसमध्ये पक्षाध्यक्ष निवड प्रक्रियेस सुरुवात; 20 सप्टेंबरच्या वेळापत्रकावर पक्ष ठाम)

दरम्यान, अशोक गेहलोत यांनी काँग्रेस पक्षाचे पुढील अध्यक्ष असल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली. एएनआयशी बोलताना ते म्हणाले की, मी मीडियाकडूनच ही बातमी ऐकली आहे, आणि यासंदर्भात कोणतीही माहिती नाही.

एएनआयच्या वृत्तानुसार, राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणाले, मला याबद्दल माहिती नाही. मी माझ्यावर सोपवलेले कर्तव्य पूर्ण करत आहे. राहुल आणि प्रियांका गांधी हे दोघेही त्यांची आई सोनिया गांधी यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी परदेशात जात असल्याने निवडणुकीची निश्चित तारीख अद्यापही प्रलंबीत आहे. येत्या काही दिवसांत अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर होईल. अध्यक्षपदाच्या शर्यतीत गांधी कुटुंबीय, अशोक गेहलोत पहिल्या, त्यानंतर मुकुल वासनिक, वेणुगोपाल, कुमारी शैलजा, मलिकार्जुन खर्गे, भूपेश बघेल यांच्यासह अनेकांची नावे चर्चेत आहेत.

काँग्रेस पक्षाने 20 ऑगस्टपर्यंत अंतर्गत निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली आहे. पक्षाने जाहीर केले होते की अध्यक्षपदासाठी 21 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर दरम्यान निवडणूक होणार आहे परंतु अनेक प्रयत्न करूनही राहुल गांधी यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही.

दरम्यान, काँग्रेसने पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून ‘भारत जोडो यात्रा’ काढण्याची योजना आखली असून 148 दिवसांच्या यात्रेचा समारोप काश्मीरमध्ये होईल. पाच महिन्यांची ही यात्रा 3,500 किलोमीटर आणि 12 राज्यांपेक्षा अधिक अंतर कापणार आहे.