'एम. जे. अकबर यांनी माझ्यावरही बलात्कार केला होता'; महिला पत्रकाराचा सणसणाटी आरोप
एम. जे. अकबर. (संग्रहित, संपादित प्रतिमा)

#MeToo मोहिमेंतर्गत केंद्रीय मंत्री एम जे अकबर यांच्या रुपात भाजप प्रणीत मोदी सरकारची पहिली विकेट पडली. अकबर यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. पण, म्हणून काही त्यांच्या मागच्या अडचणी संपल्या असे नाही. उलट अकबर यांच्यावरील आरोपांचे मोहोळ अधीकच व्याप्त रुप धारण करत आहे. एका महिला पत्राकाराने अकबर यांच्यावर नव्याने लावलेल्या आरोपामुळे हे पुन्हा एकदा पुढे आहे. 'एशियन एज' या वृत्तपत्रात कार्यरत असताना एम. जे. अकबर यांनी आपल्यावर बलात्कार केला होता. हा बलात्कार त्यांनी जयपूर येथील हॉटेलच्या एका खोलीत केला, असा आरोप या महिला पत्रकाराने केला आहे.

#MeToo मोहिमेमध्ये सहभागी होत अनेक महिलांनी आपल्यासोबत घडलेल्या लैंगिक गैरवर्तन आणि अन्यायाचे वेदनादाई अनुभव कथन केले आहेत. त्यामुळे अनेक तथाकथीत प्रसिद्ध, सभ्य आणि दिग्गज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेक मंडळींच्या नैतिकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एम जे अकबर हे सुद्धा त्यापैकीच एक. एम. जे. अकबर यांच्यावर अनेक महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप लावले आहेत. महत्त्वाचे म्हणजे या महिलांनी आपली ओळख न लपवता धडधडीतपणे अकबर यांच्यावर आरोप केले होते. त्यामुळे त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा असा दबाव सरकारवर वाढत होता. दरम्यान, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. अर्थात, #MeTooमध्ये अनेक मंडळींवर झालेले आरोप न्यायालयीन पातळीवर अद्याप सिद्ध झाले नाहीत. तर, त्यातले काही न्यायालयाच्या कक्षेतच आले नाहीत. त्यामुळे या आरोपातील सत्यासत्यता अद्याप पुढे आली नाही. मात्र, #MeToo भारत आणि जगभारत वादळ निर्माण केले आहे हे मात्र खरे.

दरम्यान, आपल्यावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप करणाऱ्या प्रिया रमाणी व इतर महिलांना एम जे अकबर यांनी न्यायालयात खेचले आहे. या महिलांविरोधात त्यांनी न्यायालयात कायदेशीररित्या मानहानीचा दावा दाखल केला आहे. अकबर यांचे हे प्रकरण न्यायालयात असतानाच अकबर यांच्यावर आणखी एका महिला पत्रकाराने थेट बलात्काराचाच आरोप लावल्याने बुडत्याचा पाय खोलात अशी अकबर यांची अवस्था झाल्याची चर्चा रंगलीआहे. अकबर यांच्यावर आरोप करणारी महिला पत्रकार अमेरिकेतील एका नामवंत प्रसारमाध्यम समूहात महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहे.