Arvind Kejriwal | PTI

लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election) INDIA आघाडीला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. आम आदमी पार्टीचे (AAP) राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आम आदमी पार्टी (आप) पंजाबमधील (Punjab) सर्व 13 लोकसभा आणि चंदीगडच्या (Chandigadh) एका जागेवर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. शनिवारी पंजाबमधील खन्ना येथे आपल्या भाषणादरम्यान अरविंद केजरीवाल यांनी घोषणा केली की, येत्या 15 दिवसांत आम आदमी पार्टी पंजाबच्या 13 लोकसभा आणि चंदीगडच्या एका जागेसह 14 लोकसभा जागांसाठी उमेदवार जाहीर करेल.

इंडिया आघाडी बनवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या नितीश कुमार यांनी काही दिवसांपूर्वीच इंडिया आघाडीला रामराम करत भाजपाशी घरोबा केला आहे.  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनीदेखील पश्चिम बंगालमध्ये ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. त्यामुळे आता केजरीवालही आघाडीतून बाहेर पडले तर आघाडी ताकद कमी होणार आहे.

अरविंद केजरीवाल यांचा पक्ष पंजाबमधील विरोधी आघाडीपासून दूर गेला आहे. ते म्हणाले, 'दोन वर्षांपूर्वी तुम्ही आम्हाला मोठा आशीर्वाद दिला होता आणि पंजाबमध्ये 117 पैकी 92 जागा जिंकल्या होत्या. आज मी तुमच्याकडे हात जोडून दुसरा आशीर्वाद मागायला आलो आहे. लोकसभेच्या निवडणुका दोन महिन्यांनी आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी पंजाबमध्ये 13 आणि चंदीगडमध्ये एक जागा आहे. येत्या 15 दिवसांत आम आदमी पार्टी या 14 जागांवर आपले उमेदवार जाहीर करणार आहे.