Anant Ambani, Radhika Merchant (PC - Twitter/@mpparimal)

लवकरच भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट (Radhika Merchant) लग्नबंधनात अडकणार आहेत. हा विवाहसोहळा या वर्षातील सर्वात प्रसिद्ध विवाहांपैकी एक आहे. येत्या 12 जुलै रोजी मुंबईत पारंपारिक पण दिमाखदार सोहळ्यात अनंत आणि राधिकाचे लग्न होणार आहे. त्याआधी जामनगर येथील अंबानी इस्टेटमध्ये 1 ते 3 मार्च असे तीन दिवस प्री-वेडिंगचे आयोजन करण्यात आले आहे. या प्री-वेडिंग सोहळ्यामध्ये अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंडळी हजेरी लावणार आहेत.

अहवालानुसार, या प्री-वेडिंग सोहळ्यामध्ये मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग, ब्लॅकरॉकचे सीईओ लॅरी फिंक, ब्लॅकस्टोनचे अध्यक्ष स्टीफन श्वार्झमन, डिस्ने सीईओ बॉब इगर, इवांका ट्रम्प, मॉर्गन स्टॅनले सीईओ टेड पिक, बँक ऑफ अमेरिकाचे अध्यक्ष ब्रायन थॉमस मोयनिहान, कतारचे पंतप्रधान मोहम्मद बिन अब्दुलरहमान बिन जसिम अल थानी, भूतानचे राजा आणि राणी, तंत्रज्ञान गुंतवणूकदार युरी मिलनर, ॲडोबचे सीईओ शंतनू नारायण अशी काही प्रसिद्ध मंडळी सहभागी होऊ शकतात.

गेल्या वर्षी जानेवारीत मुंबईत अनंत आणि राधिका यांचा साखरपुडा पार पडला. त्यानंतर यंदा 16 फेब्रुवारीपासून गुजरातमधील जामनगरमध्ये ‘लगन लखवानू’च्या कार्यक्रमाने लग्नाच्या विधींना सुरुवात झाली. लगन लखवानू हा एक शुभ गुजराती विधी आहे, ज्यामध्ये देवतांना त्यांचे आशीर्वाद प्राप्त व्हावेत म्हणून लिखित आमंत्रण दिले जाते. त्यानंतरच लग्नाची औपचारिक आमंत्रणे जवळचे कुटुंब आणि मित्रांना दिली जातात. त्यानंतर आता मार्च महिन्यात जामनगर येथे प्री-वेडिंग होणार आहे. जामनगर येथे असलेल्या रिलायन्स ग्रीन्स कॉम्प्लेक्समध्ये एक कोटीहून अधिक झाडे आहेत आणि आशियातील सर्वात मोठी आंब्याची बाग आहे. अनंत अंबानीचे या जागेशी भावनिक नाते आहे, म्हणूनच येथे प्री-वेडिंग सेलिब्रेशन होत आहेत. (हेही वाचा; Mumbai Megapolis Metaverse: मेगापॉलिस मेटाव्हर्सच्या सहकार्यातून साकार होणार स्वप्नातील मुंबई, विकासाला मिळणार गती; Devendra Fadnavis यांचा विश्वास)

जामनगर विमानतळावर 1 मार्चपासून दिवसभरात 50 हून अधिक विमाने येथे उतरणार आहेत. या प्री-वेडिंग सोहळ्यामुळे संपूर्ण जामनगर विमानतळ रिलायन्सकडून सजवण्यात येत असून, रिलायन्स रिफायनरी कॉम्प्लेक्सकडे जाणारा मार्गही तयार करण्यात येत आहे. दरम्यान, राधिका ही उद्योगपती वीरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची मुलगी आहे. राधिका मर्चंटचे वडील एनकोर हेल्थकेअरचे सीईओ आहेत आणि त्यांची गणना भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये केली जाते. राधिका तिच्या वडिलांच्या एनकोर हेल्थकेअरच्या संचालक मंडळात आहे.