Train Cancelled: 1 जुलै ते 12 ऑगस्ट या कालवधीमधील सर्व मेल, एक्सप्रेस, पॅसेंजर, लोकल रेल्वेगाड्या रद्द; प्रवाशांना मिळणार तिकिटांचा Full Refund
रेल्वे | Photo Credits: Facebook

देशातील कोरोना व्हायरस (Coronavirus) रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता भारतीय रेल्वेने (Indian Railway) आज एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. रेल्वे बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, 1 जुलै ते 12 ऑगस्ट या कालवधीमधील रेल्वे रद्द केल्या गेल्या आहेत. 12 ऑगस्टपर्यंत कोणत्याही मेल, एक्सप्रेस, पॅसेंजर ट्रेन, लोकल ट्रेन आणि ईएमयू गाड्या चालवल्या जाणार नाहीत. याशिवाय कोणी 12 ऑगस्टपर्यंत नियमित ट्रेनसाठी बुकिंग केले असेल, तर त्याला 100% परतावा मिळेल. रेल्वेने पुढे म्हटले आहे की, निवडलेल्या लोकल गाड्या (आवश्यक कर्मचार्‍यांसाठी राज्य शासनाने नेमूद दिलेल्या) सुरू ठेवण्यात येतील.

याआधी रेल्वे मंत्रालयाने सोमवारी एक परिपत्रक जारी केले होते. या परिपत्रकात मंत्रालयाने रेल्वेच्या सर्व विभागांना 14 एप्रिल रोजी किंवा त्यापूर्वी बुक केलेल्या तिकिटांची रक्कम परत करण्याचे निर्देश दिले होते. 14 एप्रिल 2020 रोजी किंवा त्यापूर्वी बुक केलेली सर्व नियमित रेल्वे तिकिटे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. असा विश्वास आहे की रेल्वे विशेष गाड्यांची संख्या वाढू शकते. सध्या देशात सुमारे 230 विशेष गाड्या कार्यरत आहेत.

रेल्वेने आपल्या 15 मे रोजीच्या अधिसूचनेमध्ये, 30 जून, 2020 पर्यंतच्या प्रवासासाठी नियोजित सर्व गाड्या रद्द करून, तिकिट परत करण्याचा निर्णय घेतला होता. आता याची मुदत वाढवण्यात आली आहे. मात्र 12 मे आणि 1 जूनपासून सुरू झालेल्या सर्व विशेष राजधानी, मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांचे काम सुरू राहील. (हेही वाचा: 14 एप्रिल 2020 रोजी किंवा त्यापूर्वी बुक केलेली सर्व रेल्वे तिकिटे होणार रद्द; प्रवाशांना मिळणार Full Refund)

दरम्यान, रेल्वे स्थानकांवरील बहुउद्देशीय स्टॉल्सवर आता कोरोना व्हायरस प्रोटेक्शन मास्क, ग्लोव्हज, बेडरोल किट्स, सॅनिटायझर्स आणि इतर आवश्यक वस्तूंची विक्री होणार आहे. रेल्वे बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार खासगी कंत्राटदारांच्या स्टॉल्सवर प्रवाशांना आवश्यक असलेल्या सौंदर्यप्रसाधने, पुस्तके, औषधे आणि खाद्यपदार्थांची पाकिटे अशा वस्तू असतील. आता या स्टॉल्सना प्रवाशांना कोरोना विषाणूच्या संसर्गापासून वाचवणार्‍या जीवनावश्यक वस्तूंची विक्री करता येणार आहे.