दिल्ली कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय माकन यांचा राजीनामा
अजय माकन (Photo Credits: PTI)

दिल्ली कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय माकन (Ajay Maken) यांनी शुक्रवारी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. माकन यांनी राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधी, कॉंग्रेस पक्ष आणि कार्यकर्ते तसेच मीडीयाचेदेखील आभार मानले आहे. अजय माकन यांच्या राजीनामाचे प्रमुख कारण त्यांची प्रकृती ठीक नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

अजय माकन राजीनामा देणार असल्याचं मागील सप्टेंबर महिन्यापासून चर्चेमध्ये होते. कॉंग्रेस पक्षाच्या एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार अजय माकन काही दिवसांपूर्वी वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी परदेशात गेले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अजय माकन यांचा राजीनामा स्वीकारला आहे. 54 वर्षीय अजय माकन मागील चार वर्षांपासून दिल्ली कॉंग्रेसच्याप्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सांभाळत आहेत. दिल्लीत कॉंग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला होता त्यावेळेस कठीण काळात त्यांनी कॉंग्रेसला साथ दिली.