टाटा समूहाच्या (Tata Group) मालकीची एअर इंडिया (Air India) आपल्या फ्लीट आणि ऑपरेशन्सचा विस्तार करत आहे. एअरलाइनने बोईंग आणि एअरबसकडे 70 वाइडबॉडी विमानांसह 470 विमानांच्या खरेदीची ऑर्डर दिली आहे. आता माहिती मिळत आहे की, एअरलाइनने यावर्षी 4,200 केबिन क्रू (Cabin Crew) आणि 900 पायलट (Pilots) भरती करण्याची योजना आखली आहे.
टाटा समूहाने जानेवारी 2022 मध्ये एअर इंडियाचे अधिग्रहण केले होते. एअरलाइनची 36 विमाने भाडेतत्त्वावर घेण्याची योजना आहे. त्यापैकी दोन B777-200LR आधीच समाविष्ट करण्यात आले आहेत. टाटा समूहाने एअर इंडिया ताब्यात घेतल्यापासून विमान कंपनीचा विस्तार आणि सेवा सुधारण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत.
एअरलाइनच्या ताफ्यात नवीन विमाने येत आहेत आणि कंपनीने त्यांचे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय ऑपरेशन्स वाढवले आहेत. म्हणूनच एअर इंडियाने 2023 मध्ये 4,200 नवीन केबिन क्रू प्रशिक्षणार्थी आणि 900 पायलट नियुक्त करण्याची योजना आखली आहे. मे 2022 ते फेब्रुवारी 2023 दरम्यान, एअरलाइनने 1,900 पेक्षा जास्त केबिन क्रू नियुक्त केले. गेल्या सात महिन्यांत (जुलै 2022 ते जानेवारी 2023 दरम्यान), 1,000 हून अधिक क्रू मेंबर्सना प्रशिक्षित केले गेले आहे आणि गेल्या तीन महिन्यांत, एअरलाइनने सुमारे 500 क्रू मेंबर्सना उड्डाणासाठी सोडले आहे. (हेही वाचा: Thiruvananthapuram International Airport वर संपूर्ण आणीबाणी घोषित; एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचे करण्यात आले आपत्कालीन लँडिंग)
एअर इंडियाच्या इनफ्लाइट सेवांचे प्रमुख संदीप वर्मा म्हणाले की, नवीन प्रतिभांचा समावेश केल्याने एअरलाइनमध्ये सांस्कृतिक बदलाची गती वाढेल. एअरलाइन आणखी पायलट आणि देखभाल अभियंत्यांची भरती वाढवण्याचा विचार करत आहे. एअर इंडियाच्या मते, ज्या केबिन क्रू प्रशिक्षणार्थींची भरती केली जाईल त्यांना मुंबईतील एअरलाइन्सच्या प्रशिक्षण सुविधेमध्ये 15 आठवड्यांचा टॅनिंग प्रोग्राम करावा लागेल, ज्यामध्ये क्लासरूम ते इन-फ्लाइट ट्रेनिंगचा समावेश आहे.