Air India Express Plane Crash (Photo Credits: ANI)

केरळ (Kerala) मधील कोझिकोड (Kozhikode) आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी (7 ऑगस्ट) रात्री झालेल्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाच्या भीषण अपघातातील (Air India Express plane Crash) 56 जखमींना आज केरळमधील विविध हॉस्पिटल्समधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या अपघातात तब्बल 18 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही माहिती एअर इंडिया एक्स्प्रेसकडून देण्यात आली आहे.

IX-1344 हे विमान दुबईहून केरळच्या दिशेने निघाले होते. मात्र लँडिंग दरम्यान ते धावपट्टीवरुन घसरले आणि दरीत कोसळले. यामुळे विमानाचे दोन तुकडे झाले. या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला तर 123 प्रवासी जखमी झाले होते. जखमी प्रवाशांवर केरळमधील विविध हॉस्पिटल्समध्ये उपचार सुरु होते. त्यापैकी 56 प्रवासी पूर्णतः बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी मिळाली आहे.

ANI Tweet:

विमान अपघातात 12 वर्षांवरील मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या कुटुबियांना 10 लाख तर 12 वर्षांखालील मृत प्रवाशांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत करण्यात येणार आहे. तर गंभीररीत्या जखमी झालेल्या प्रवाशांना 2 लाख तर जखमींना 50 हजारांची मदत करण्यात येणार असल्याची माहिती एअर इंडियाने दिली आहे. त्याचबरोबर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी मृतांसाठी 10 लाख रुपये, गंभीर जखमींना 2 लाख रुपये आणि अपघातात किरकोळ जखमी झालेल्यांना 50 हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा केली.

दरम्यान या भीषण विमान अपघातात एअर इंडियाचे अनुभवी आणि विविध पुरस्कारांनी सन्मानित वैमानिक दीपक वसंत साठे यांचे निधन झाले. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिवंगत दीपक साठे यांच्या नागपूर येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियाची भेट घेतली.