गुजरातमधील एका सरकारी महिला शिक्षिका मागील आठ वर्षांपासून अमेरिकेत (US) बसून पगार घेत असल्याची माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यांना (student) काहीही न शिकवता ही महिला शिक्षिका मागील आठ वर्षांपासून सरकारकडून लाखो रुपायांचा पगार घेत असल्याचं वास्तव समोर आलेय. विद्यार्थ्यांच्या पालकांनी आणि अन्य शिक्षकांनी तक्रार करुनही अद्याप तरी मुख्य शिक्षिकेविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. महिला शिक्षिकेचा 'प्रताप' उघड झाल्यानंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. झाला आहे. (हेही वाचा - Madhya Pradesh High Court: मोबाईल शोधण्यासाठी शिक्षिकेने अल्पवयीन विद्यार्थिनींना केले विवस्त्र; मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने बजावली राज्य सरकारला नोटीस)
बनासकांठातील अंबाजीमधील पांछा प्राथमिक शाळेच्या मुख्य शिक्षिका भावनाबेन यांच्याकडे अमेरिकेचं ग्रीन कार्ड आहे. त्या 8 वर्षांपूर्वी अमेरिकेच्या शिकागोमध्ये स्थायिक झाल्या. तेव्हापासून त्या तिथेच राहतात. पण तरीही भावनाबेन पटेल यांचं नाव अंबाजी शाळेत मुख्य शिक्षिका म्हणून आहे. तरी देखील गुजरातच्या शिक्षक विभागाकडून गेली आठ वर्ष नित्य नियमाने त्यांचा पगार हा देण्यात येत आहे. भावनाबेन पटेल वर्षातून केवळ एकदा दिवाळीच्या सुट्टीत गुजरातमध्ये येतात. त्या कालावधीत शाळेला सुट्टी असते. त्यामुळे त्यांना ना शाळेत जावं लागतं, ना मुलांना शिकवावं लागतं. भावनाबेन पटेल यांच्या विरोधात विद्यार्थ्यांच्या पालकांनी आणि मुख्याध्यापकांनी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिलेली आहे.
भावनाबेन पटेल यांचं हे प्रकरण गुजरातसह देशभरात गाजलं. त्यानंतर शिक्षण मंत्र्यांकडून कारवाईचे संकेत देण्यात आले. गुजरातचे शिक्षण मंत्री कुबेर डिंडोर म्हणाले की, चालू ड्युटीवर असताना विदेशात राहणाऱ्या सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट मागवण्यात आला आहे. त्या सर्वांवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याशिवाय राज्यातील सर्व शाळांची तपासणी करण्यात येईल, दोषी आढळणाऱ्या सर्वांवर कारवाई करण्यात येईल.