Goa Assembly Election 2022: गोव्यातही महाराष्ट्र पॅटर्न वापरलं जातय; भाजपकडून विरोधकांचे फोन टॅपिंग होत असल्याचा संजय राऊत यांचा दावा
संजय राऊत । PC: Twitter/ANI

देशात पाच राज्यांमधील निवडणूकीचे निकाल आता अवघ्या 5 दिवसांवर येऊन ठेपले आहेत. या पार्श्वभूमीवर आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. आज संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देवेंद्र फडणसवीस यांचा थेट उल्लेख न करता भाजपा (BJP) कडून गोव्यात (Goa) विरोधकांचे फोन टॅपिंग सुरू असल्याचा दावा केला आहे. यामध्ये संजय राऊतांचाही फोन टॅप होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात जो फोन टॅपिंगचा पॅटर्न होता तोच या गोव्यातही दिसून येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

आम्ही कुणाशी बोलतो, कुणला भेटतो याची माहिती महाराष्ट्रात पोलीस अधिकारी कोणाला देत होते हे सर्वांना माहिती आहे. अशा प्रकारचे पॅटर्न आता इतर राज्यांतही ज्या ठिकाणी आता विधानसभेच्या निवडणुका आहेत तेथे राबवले जात आहेत असा दावा राऊतांनी केला आहे. दरम्यान यावरून गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते दिगंबर कामत यांच्याशी बोलणं देखील झाल्याच म्हटलं आहे. गोव्यात कामतांनी एक पत्रकार परिषद घेऊन कॉंग्रेस नेत्यांचे फोन टॅप होत असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. हे देखील नक्की वाचा: Sanjay Raut On BJP: महापालिका निवडणुकीमुळे केंद्रीय तपास यंत्रणांना महाराष्ट्रातच काम मिळाले आहे, मात्र आम्ही झुकणार नाही म्हणत संजय राऊतांचे भाजपवर टीकास्त्र .

संजय राऊत ट्वीट

राऊतांनी केवळ दिगंबर कामत नव्हे तर तर सुदिन ढवळीकर आणि विजय सरदेसाई यांचेही फोन भाजपकडून टॅप केले जात आहेत, असे त्यांना सांगितल्याचा दावा केला आहे. आज मुंबई मध्ये मीडीयाशी बोलताना संजय राऊत यांनी आता भाजपने केजीबी आणि सीआयए या संस्थांनाही मदतीसाठी घ्यावे, असा टोला लगावला आहे.

गोव्यात भाजप सत्तेपासून दूर राहील. 10 मार्चनंतर गोव्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास केंद्रीय तपासयंत्रणा गोव्यातही सक्रिय केल्या जातील. यामध्ये फोन टॅपिंग ही त्यांची पूर्वतयारी आहे. असा दावा राऊतांनी मीडीयाशी बोलताना केला आहे.