AAP DP Campaign: आम आदमी पक्षाचे  'डीपी कॅम्पेन'; मोदी विरोधकांना डीपी बदलण्याचं केलं आवाहन

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हे सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. पण आम आदमी पार्टीनं यावरुन दिल्लीत रान पेटवलं आहे. केजरीवालांच्या अटकेपासून पक्षानं तिथं आंदोलनं सुरु केली आहेत. तसेच केंद्र सरकारवर टीकात्मक कार्यक्रम राबवण्यात येत आहे. दिल्लीच्या मंत्री आणि आप नेत्या अतिशी (Delhi Minister and AAP leader Atishi) यांनी या कॅम्पेनची माहिती दिली. आता आपनं डीपी कॅम्पेन सुरु केलं आहे. तसेच ज्यांचा मोदींना विरोध आहे त्या सर्व देशवासियांना आपले डीपी बदलण्याचं आवाहन केलं आहे. (हेही वाचा - INDIA Bloc Mega Rally: केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ दिल्लीत 31 मार्च रोजी इंडिया ब्लॉकची मेगा रॅली, आप-काँग्रेसची घोषणा)

पाहा पोस्ट -

आपच्या नेत्या आणि प्रवक्त्या आतिषी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, "अरविंद केजरीवाल यांची प्रेरणा घराघरात पोहोचवण्यासाठी आज संपूर्ण देशभरात सोशल मीडियावर एक डीपी कॅम्पेनची सुरुवात आम्ही करत आहोत. आज दुपारी 3 वाजल्यापासून आम आदमी पार्टीचे सर्व कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकारी आपले डीपी बदलणार आहेत" यावेळी डीपीसाठी त्यांनी एक फोटो देखील पत्रकार परिषदेत सादर केला. यामध्ये तुरुंगाच्या गजांआड असलेले केजरीवाल दिसत आहेत तसेच त्यावर 'मोदी का सबसे बडा डर केजरीवाल' असा संदेश लिहिला आहे.

आतिषी पुढे म्हणाल्या की, देशातील सर्व लोकांनाही मी आवाहन करु इच्छिते की जर तुम्ही अरविंद केजरीवालांचे समर्थक असाल, तुम्ही हुकुमशाही विरोधात आवाज उठवू इच्छित असाल, जर देशातील लोकशाही तुम्ही वाचवू इच्छित असाल, तसेच जर तुम्ही पंतप्रधान मोदी लोकशाही संपवत आहेत, हा संदेश देऊ इच्छित असाल तर माझं सर्व देशवासियांना आवाहन आहे की हा फोटो त्यांनी डीपीवर ठेवावा.