Coronavirus in Ministry of Labour and Employment: कामगार आणि रोजगार मंत्रालयातील एकूण 36 जणांना कोरोना विषाणूची लागण
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

भारतात कोरोना संसर्गाच्या (Coronavirus) बाबतीत सतत वाढ होत आहे. देशात दररोज हजारो प्रकरणे नोंदवली जात आहेत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीची (Delhi) अवस्थाही अत्यंत गंभीर बनली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कामगार व रोजगार मंत्रालयाच्या (Ministry of Labour and Employment) 25 कर्मचार्‍यांना या आठवड्यात कोरोनाची लागण झाल्याचे आढळले असून आहे. त्यानंतर आता मंत्रालयात संक्रमित होण्याचे प्रमाण आता 36 वर पोहोचले आहे. बर्‍याच कर्मचार्‍यांच्या कुटुंबातही कोरोना संसर्गाचीही पुष्टी झाली आहे. यातील सहा संक्रमित कर्मचारी कामगार मंत्री संतोष गंगवार (Santosh Gangwar) यांचे वैयक्तिक कर्मचारी आहेत.

गेल्या आठवड्यात मंत्रालयात दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यावर उर्वरित कर्मचार्‍यांची तपासणी केली गेली होती. त्यानंतर श्रम शक्ति भवन (Shram Shakti Bhawan) इमारतीची दोन दिवस स्वच्छता करण्यात आली होती. सध्याच्या वृत्तानुसार श्रम शक्ती भवन पुन्हा एकदा स्वच्छता करण्याच्या दृष्टीने बंद करण्याचा विचार केला जात आहे. संक्रमित व्यक्तींना घरी वेगळे राहण्यास सांगितले आहे. श्रम शक्ती भवन 4 आणि 5 जून रोजी सील करण्यात आले होते, परंतु ऊर्जा मंत्रालयाने 5 जून रोजी आपल्या कर्मचार्‍यांना काही कामासाठी बोलावले होते. (हेही वाचा: कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाकडून धार्मिक स्थळ, मॉल्स, हॉटेल, ऑफिस संदर्भात मार्गदर्शक सुचना जारी)

कामगार व रोजगार मंत्रालयात यापूर्वी संक्रमित झालेल्या 10 लोकांमध्ये सहसचिव, स्टेनो, प्रमुख खाजगी सचिव, खासगी सचिव, सहा मल्टी-टास्क असिस्टंट आणि चालक यांचा समावेश होता. दरम्यान, कोविड-19 साथीच्या रोगाचा मुकाबला करण्यासाठी, दोन दिवस इमारत बंद करणे ही मानक ऑपरेटिंग प्रक्रियेचा एक भाग होता. त्याअंतर्गत दोन किंवा अधिक कर्मचारी कोविड-19 संसर्गग्रस्त आढळल्यास, कोणत्याही मंत्रालयाच्या किंवा विभागाच्या संपूर्ण इमारती स्वच्छतेसाठी सीलबंद केल्या जातात.