Pig (Photo Credits: Pixabay)

सध्या कोरोना व्हायरसशी (Coronavirus) लढताना भारताची दमछाक होत असताना एक नवीन संकट डोके वर काढत असल्याचे दिसत आहे. आफ्रिकन स्वाइन फ्लूच्या (African Swine Flu) संसर्गामुळे गेल्या काही दिवसांत आसाम (Assam) मध्ये, 13 हजाराहून अधिक डुकरांचा (Pig) मृत्यू झाला आहे. याचा परिणाम पशुसंवर्धनात अथवा पशुपालन व्यवसायात असलेल्या शेकडो लोकांच्या रोजीरोटीवर झाला आहे. पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विभागाचे प्रवक्ते म्हणाले की, हा संसर्ग खूप वेगाने पसरत असून, हा रोग आसाममधील नऊ जिल्ह्यांमध्ये पसरला आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पहिल्यांदा आसाममध्ये हा आजार समोर आला.

सुरुवातीला हा रोग डिब्रूगड, शिवसागर, जोरहाट, धेमाजी, लखीमपूर आणि बिश्वनाथ या सहा जिल्ह्यांमध्ये पसरला होता पण आता तो आणखी तीन जिल्ह्यांत पसरला आहे. काझीरंगा नॅशनल पार्कच्या अधिकार्‍यांनी जंगलातील डुकरांना या आजारापासून वाचवण्यासाठी, जवळच्या गावात जाण्यापासून रोखण्यासाठी आगरातोली रेंज (Agoratoli Range) मध्ये एक कालवा खणला आहे: आसामचे पशुसंवर्धन मंत्री अतुल बोरा यांनी याबाबत माहिती दिली. अतुल बोरा शनिवारी काझीरंगा नॅशनल पार्कला भेट दिली. (हेही वाचा: पुण्यातील NIV ने विकसित केली Antibody Detection kit; अडीच तासांमध्ये होणार 90 नमुन्यांची चाचणी)

आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी डुकरांना या प्राणघातक रोगापासून वाचविण्याच्या सूचना पशुवैद्यकीय व वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (Indian Council of Agricultural Research, ICAR), नॅशनल डुक्कर संशोधन केंद्र ((National Pig Research Centre, NPRC) ) सोबत काम करण्यास सांगण्यात आले आहे. बोरा यांनी सांगितले की, 2019 च्या जनगणनेनुसार राज्यात डुकरांची संख्या 21 लाख होती, ती वाढून सुमारे 30 लाख झाली. आता या आजारामध्ये केंद्राकडून मान्यता असूनही, राज्य सरकारने त्वरित डुकरांना न मारण्याचा निर्णय घेतला आहे.