fraud | (Photo credit: archived, edited, representative image)

दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) एका बनावट आयपीएसला अटक केली आहे. आरोपीने स्वतःला आयपीएस सांगून 12 हून अधिक मुलींची फसवणूक केली आहे. दिल्ली पोलिसांचे डीसीपी हरिंदर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयटीआयमधून वेल्डिंगचा कोर्स केलेल्या ग्वाल्हेरचा रहिवासी विकास गौतम याने सोशल मीडियावर स्वतःचे बनावट खाते तयार केले होते. विकास गौतम हा केवळ 8वी पास आहे. विकास गौतमने विकास यादवच्या नावाने हे बनावट खाते तयार करून, आपण आयपीएस अधिकारी असल्याचे भासवले.

विकासने सोशल मीडियावर जो फोटो टाकला होता त्यात तो लाल दिवा असलेल्या सरकारी अधिकाऱ्याच्या वाहनाशेजारी उभा राहिल्याचे दिसत आहे. डीसीपी हरिंदर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने बनावट आयपीएस प्रोफाइलद्वारे दिल्लीच्या संजय गांधी रुग्णालयातील महिला डॉक्टरशी चॅटिंग सुरू केले, त्यानंतर डॉक्टर या बनावट आयपीएसच्या जाळ्यात अडकली. विकासने तिच्याकडून आपल्या खात्यामध्ये 25 हजार रुपये ट्रान्सफर करून घेतल्यानंतर महिलेला संशय आला.

हळूहळू या बनावट आयपीएसचे रहस्य उघडकीस आल्यावर महिला डॉक्टरने पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी पाळत ठेवून आरोपी विकास गौतम उर्फ ​​विकास यादव याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान असे आढळून आले की, आरोपी विकास गौतम हा दिल्लीतील मुखर्जी नगरमधील एका रेस्टॉरंटमध्ये काम करायचा, जेथे नागरी सेवांची तयारी करणारे विद्यार्थी यायचे. तेथूनच बनावट आयपीएस बनून महिलांची फसवणूक करण्याचा हा प्रकार त्याच्या डोक्यात आला. (हेही वाचा:  माझ्यावर कोणीही प्रेम करत नाही लिहून उचलले टोकाचे पाऊल, नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या)

तपासात आरोपीने अशाच प्रकारे डझनभर हायप्रोफाईल महिलांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. याआधीही विकास गौतम यूपी आणि ग्वाल्हेरमध्ये फसवणुकीच्या आरोपाखाली तुरुंगात गेला आहे.