नियोजित लग्नाचे कारण देत किंवा लग्न होणार आहे या बहाण्याने आपल्या मंगेतरवर अनेक वेळा बलात्कार (Rape) केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन नाकारला आहे. उच्च न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले आहे की, केवळ साखरपुडा झाला आहे याचा अर्थ असा नाही की, आरोपी आपल्या होणाऱ्या पत्नीवर लैंगिक अत्याचार करू शकतो, मारहाण करू शकतो किंवा धमकी देऊ शकतो.
न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांनी आरोपीच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद फेटाळताना हे निरीक्षण नोंदवले. आरोपीने युक्तिवाद केला होता की, त्याने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन लैंगिक अत्याचार केला नव्हता. मात्र न्यायालयाने त्याची बाजू फेटाळली. 22 सप्टेंबर रोजी दिलेल्या न्यायालयाच्या आदेशानुसार, आरोपीच्या या युक्तिवादाला कोणतेही बल नाही. फक्त साखरपुडा ही गोष्ट मुलीवर लैंगिक अत्याचार करणे, मारहाण करणे किंवा धमकावण्याचा अधिकार देत नाही.
Mere Engagement Does Not Permit A Person To Sexually Assault His Fiancé: Delhi High Court In Bail Order @nupur_0111 https://t.co/JVJK5b1xdC
— Live Law (@LiveLawIndia) October 6, 2022
ऑक्टोबर 2020 पासून आरोपी आणि पिडीतेमध्ये मैत्री आहे. जवळपास एक वर्ष ते एकत्र राहिल्यानंतर त्यांनी गेल्या वर्षी 11 ऑक्टोबर रोजी घरच्यांच्या संमतीने साखरपुडा केला होता. एफआयआरनुसार, साखरपुडा झाल्याच्या चार दिवसांनंतर, लवकरच आपले लग्न होणार आहे असे सांगून आरोपीने पीडितेवर बळजबरी केली व पुढे शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
आरोपीवर दारूच्या नशेत पीडितेला निर्दयीपणे मारहाण केल्याचा आरोप आहे. त्याने कथितरित्या तिच्याशी अनेक प्रसंगी गैर-सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले, ज्यामुळे कथितरित्या तिची गर्भधारणा झाली. एफआयआरनुसार पीडितेला आरोपीने यावर्षी फेब्रुवारीमध्ये गर्भधारणा करण्यासाठी गोळ्या दिल्या होत्या. (हेही वाचा: Delhi High Court कडून बलात्कार आरोपीची दोन अनाथाश्रमांना बर्गर देण्याच्या बदल्यात Rape FIR रद्द)
हे आरोप अतिशय गंभीर असल्याचे मत नोंदवत, आरोपीविरुद्ध, भारतीय दंड संहिता, 1860 च्या कलम 376 (बलात्कारासाठी शिक्षा) आणि 323 (स्वैच्छिकपणे दुखापत करण्यासाठी शिक्षा) अंतर्गत 16 जुलै रोजी एफआयआर नोंदवण्यात आला. 16 सप्टेंबर रोजी या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले.