Money | Image Used For Representational Purpose Only (Photo Credits: pixabay)

'देव तारी त्याला कोण मारी' अशी एक म्हण आहे. त्याचाच प्रत्यय केरळमधील (Kerala Lottery) एका मासे विक्रेत्याला आला आहे. या मासेविक्रेत्याने एका बँकेचे कर्ज घेतले होते. त्याबद्दल त्याला नोटीस आली होती. त्याच्याकडे बँकेचे हाप्ते भरण्यासपैसेच नव्हते. पण, घडले असे की, या मासे विक्रेत्याने आगोदरच एक लॉटरीचे तिकीट काढले होते. योगायोगाने बँकेचे नोटीस आल्यापासून साधारण तीन तासांनी लॉटरी फुटली. मासेविक्रेत्याला चक्क 70 लाख रुपयांची लॉटरी लागली.

पुकुंजू असे या व्यक्तीचे नाव आहे. onmanorama डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, पुकुंजू याला बँकेने सुमारे 12 लाख रुपयांच्या कर्जाची रक्कम परत करता न आल्याने संलग्नक नोटीस बजावली होती. पैसे परत कसे करायचे याबाबत पुकुंजू विचार करत असतानाच त्याला त्याच्या भावाचा फोन आला त्याला 70 लाखांची लॉटरी लागली आहे.

मैनागपल्लीच्या पलामूतिल येथील रहिवासी, पुकुंजू हा 40 वर्षीय तरुण मोटारसायकलवर मासे विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. आठ वर्षांपूर्वी पुकुंजू यांनी घर बांधण्यासाठी कॉर्पोरेशन बँकेकडून ७.४५ लाखांचे कर्ज घेतले होते. तेव्हापासून कर्जाची रक्कम फेडण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. आता त्याच्यावर व्याजासह सुमारे 12 लाख रुपयांचे कर्ज आहे. बँकेची अटॅचमेंट नोटीस मिळाल्यावर पुढे काय करायचे या चिंतेत तो पडला. तो जवळजवळ आपले घर गमावण्याच्या मार्गावर होता. मात्र, दुपारी 3.30 च्या सुमारास त्यांना सर्वात अनपेक्षित वळण लागले. अक्षया लॉटरीत अव्वल पारितोषिक जिंकण्याचे भाग्य त्याला मिळाले.

पुकुंजू याचे वडील युसूफ कुंजू वारंवार लॉटरी खरेदी करतात. तथापि, पुकुंजू क्वचितच लॉटरीची तिकिटे खरेदी करतो. मंगळवारी त्यांनी प्लामूटिल मार्केटमधील लॉटरी विक्रेत्या गोपाला पिल्लई यांच्याकडून लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. तिकीट क्रमांक कन्फर्म केल्यानंतर, ते आपल्या पत्नी आणि मुलांकडे गेला आणि त्यांना आनंदाची बातमी सांगितली.