
भारतात लग्न (Marriage) किंवा निकाह हा केवळ दोन व्यक्तींमध्येच नाही तर दोन कुटुंबांमध्ये होतो असे मानले जाते. विवाह जरी वधू आणि वर यांच्यात होत असला तरी, यामळे दोन कुटुंबांमध्ये संबंध प्रस्थापित होत असतात. लग्नाच्या दिवशी दोन्ही कुटुंबातील लोक आनंदाने समारंभात सहभागी होतात आणि वधु-वराला नव्या आयुष्यासाठी आशीर्वाद देतात. मात्र अनेकवेळा लग्न समारंभात असे काही घडते ज्यामुळे ते लग्न त्याच दिवशी मोडण्याच्या मार्गावर पोहोचते. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बुलंदशहरमध्ये (Bulandshahr) घडला आहे.
या ठिकाणी 27 जानेवारी रोजी एक विवाह सोहळा आयोजित होता. वधूची बाजू औरंगाबाद, बुलंदशहर, तर वर हा सीलमपूर, दिल्ली येथील होता. लग्नाची वरात औरंगाबादमधील लग्नमंडपात वेळेवर पोहोचली. पाहुण्यांनी पोटभर जेवण केले. खाण्यापिण्याच्या कार्यक्रमानंतर काझीने वधू-वराचा निकाह लावला. आत्तापर्यंत सगळे ठीक होते. यानंतर वधूपक्षातील कोणीतरी वराच्या आजीकडे खुर्चीची विनंती केली. यावर वराची आजी भयंकर चिडली. कोणी आपल्याकडे खुर्ची कशी मागू शकते? याचा तिला भयंकर राग आला आणि हा अपमानही वाटला. त्यानंतर पुढे एकच गोंधळ माजला.
यावरून वर आणि त्याच्या भावाने भांडण सुरु केले व हे पाहून वधूनेही आक्रमक वृत्ती दाखवली. वाढत्या तणावादरम्यान, तिने लग्नाला पुढे जाण्यास ठामपणे नकार दिला आणि परिस्थिती आणखी चिघळली. हा गोंधळ इतका वाढला की काही तासांपूर्वी जिथे काझींनी निकाह लावला होता, तिथे आता घटस्फोटाची परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर वधू पक्षाने लग्नघराला आतून कुलूप लावून वराला व लग्नातील पाहुण्यांना ओलीस ठेवले आणि वर पक्षाकडे वधूचा घटस्फोट आणि लग्नाच्या खर्चाची प्रतिपूर्ती अशा मागण्या ठेवण्यात आल्या. यावेळी दोन्ही पक्षांमध्ये मोठे भांडण झाले. (हेही वाचा: Bhopal Habib Nazar Third Marriage: ऐकावे ते नवलं! वयाच्या 103 व्या वर्षी स्वातंत्र्यसैनिकाने केलं 49 वर्षीय बेगमशी तिसरे लग्न, वाचा सविस्तर वृत्त)
जेव्हा हे प्रकरण वाढले तेव्हा वराच्या बाजूने समारंभावर झालेला खर्च देऊन प्रकरणावर पडदा टाकला. लग्नानंतर काही तासांतच घटस्फोटाने हे नाते संपुष्टात आले व लग्नाची वरात वधुशिवाय दिल्लीला परत आली. रात्री आठ वाजता हा विवाहसोहळा पार पडला आणि त्याच रात्री दीड वाजता घटस्फोट झाला. सध्या ही घटना सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. या घटनेबाबत अद्याप कोणतीही औपचारिक तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. मात्र, सहाय्यक पोलीस अधीक्षक (एएसपी) नगर अनुकृती शर्मा यांनी या प्रकरणाच्या सखोल तपासाच्या महत्त्वावर जोर देऊन, कोणतीही तक्रार आल्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.