7th Pay Commission Latest Update: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! Basic Pay मध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-PTI)

7 व्या वेतन आयोगाप्रमाणे (7th Pay Commission) पगार मिळणाऱ्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महिन्याच्या बेसिक पे (Basic Pay) मध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर महागाई भत्त्याचा (Dearness Allowance) संपूर्ण लाभ सुद्धा मिळू शकतो. कर्मचाऱ्यांच्या वतीने सरकारसमोर आपली बाजू मांडणारे शिव गोपाल मिश्रा यांनी सांगितले की, "महागाई भत्ता पूर्ववत झाल्यानंतरच्या बेसिक पे वर फिटमेंट फॅक्टर (Fitment Factor) लागू केले जाईल."

कोविड-19 संकटात केंद्र सरकारने 1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 असे महागाई भत्ताचे तीन हप्ते स्थगित केले आहेत. परंतु, आता येत्या 1 जुलै पासून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना, पेन्शनर्संना डीएचा पूर्ण लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर बाकी असलेले तीन हप्ते देखील देण्यात येतील. यासोबतच महागाई भत्तामध्ये देखील वाढ होऊन तो 17 टक्क्यांवरुन 28 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. (7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी DA संदर्भातील मोठी बातमी! 'या' दिवशी मिळणार वाढीव पगार)

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोग लागू करताना फिटमेंट फॅक्टर 2.57 इतका ठरवण्यात आला होता. त्यानुसार कर्मचाऱ्याचा महिन्याच बेसिक पगार, पीएफ, ग्रॅच्युएटी आणि अन्य मध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती शिव गोपाल मिश्रा यांनी दिली.

7 वे वेतन आयोगाचा फिटमेंट फॅक्टर महिन्याचा बेसिक पगार ठरवण्यात मदत करतं. महिन्याचा बेसिक पगार आणि फिटमेंट फॅक्टरचा गुणाकाराने बेसिक पगार ठरवतात, असेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचा राहिलेला महागाई भत्ता मिळणार की नाही याबाबत अद्याप कोणतंही अपडेट हाती आलेलं नाही. जुलै ते डिसेंबर 2021 पर्यंत महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा सरकारकडून अद्याप करण्यात आलेली नाही. या महिन्यात ती घोषणा करण्याची शक्यता आहे.