7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आणखी एका भत्त्यात होणार वाढ; जाणून घ्या किती वाढू शकतो पगार
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit: archived, edited, representative image)

विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना भेट मिळू शकते. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ अपेक्षित आहे. अशाप्रकारे केंद्रीय कर्मचाऱ्यांना या महिन्यात पुन्हा एकदा त्यांच्या पगाराबाबत खुशखबर मिळू शकते. जानेवारी 2022 मध्ये पुन्हा एकदा महागाई भत्ता (Dearness Allowance) वाढणार आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांचा पगार पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. 2021 मध्ये कोरोनाच्या काळात डीएमध्ये वाढ झाली होती. दुसरीकडे, फिटमेंट फॅक्टरबाबत जवळपास तीन वर्षांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागणीवरही केंद्र सरकारचा निर्णय येऊ शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोदी सरकार फिटमेंट फॅक्टर वाढवण्याचाही विचार करत आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांचे फिटमेंट फॅक्टर वाढल्यास त्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ होऊ शकते. महागाई भत्त्यात किती वाढ होणार हे अद्याप ठरलेले नाही. मात्र, ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स (AICPI) ची नोव्हेंबरची आकडेवारी जाहीर झाली आहे. AICPI च्या आकडेवारीनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ होऊ शकते. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 31 टक्के महागाई भत्ता मिळत आहे. जानेवारीमध्ये महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढला तर, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांपर्यंत वाढेल.

याशिवाय, 2022 च्या अर्थसंकल्पापूर्वी फिटमेंट फॅक्टरबद्दल वेगाने चर्चा सुरू आहे, ज्यावर निर्णय कोणत्याही दिवशी येऊ शकतो. असे झाले तर कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतनही वाढेल. फिटमेंट फॅक्टर सध्या 2.57 आहे, जर तो 3.68 पर्यंत वाढवला ​​तर किमान वेतन मर्यादा 26000 रुपये होईल. याचा अर्थ कर्मचाऱ्यांच्या पगारात थेट 8000 रुपयांची वाढ होणार आहे, तसेच त्यावरील डीएमध्येही वाढ होणार आहे. (हेही वाचा: आता केवायसीसाठी फिरावे लागणार नाही, सरकारकडून लवकरच One Nation One KYC योजना आणली जाणार)

सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन ठरवण्यासाठी फिटमेंट फॅक्टर हे सूत्र आहे. 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशींवर त्याची अंमलबजावणी करण्यात आली. शेवटच्या वेळी फिटमेंट फॅक्टर 2016 मध्ये वाढवण्यात आला होता. त्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 6 हजारांवरून 18 हजार रुपये करण्यात आले.