Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

अनेक राज्य सरकारांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सणापूर्वी त्यांचा महागाई भत्ता (Dearness Allowance) वाढवून एक मोठे गिफ्ट दिले आहे. मात्र केंद्र सरकारचे कर्मचारी अद्यापही महागाई भत्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. असे सांगितले जात आहे की, सरकार सप्टेंबरच्या सुरुवातीला केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ करण्याची घोषणा करू शकते. मात्र याबाबत सरकारकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन समोर आलेले नाही. मात्र, आठवा वेतन आयोग तूर्तास येणार नसल्याचे सरकारने निश्चितपणे स्पष्ट केले आहे.

सरकार दर सहा महिन्यांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात बदल करते. मागच्या वेळी सरकारने मार्च 2022 मध्ये कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये तीन टक्क्यांनी वाढ केली होती. यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 31 टक्क्यांवरून 34 टक्के करण्यात आला. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 34 टक्के दराने डीए दिला जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए चार टक्क्यांनी वाढवू शकते. पण हे कधी होणार, याबाबत सरकारने काहीही सांगितलेले नाही.

मार्चमध्ये डीए वाढवून आता सहा महिने पूर्ण होणार आहेत, त्यामुळे कर्मचारी नव्या वाढीच्या प्रतीक्षेत आहेत. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी नुकतेच लोकसभेत सांगितले होते की, औद्योगिक कामगारांसाठीच्या अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या (ACIPI) आधारावर महागाई वाढ मोजली जाते. या आधारावर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दर सहा महिन्यांनी बदलला जातो. (हेही वाचा: CBI तपासाची तब्बल 6700 भ्रष्टाचार प्रकरणे न्यायालयांमध्ये अजूनही प्रलंबित; 275 केसेस 20 वर्षे जुन्या- CVC Report)

जर सरकारने कर्मचाऱ्यांचा डीए 34 टक्क्यांवरून 38 टक्के केला तर त्यांच्या पगारात मोठी वाढ होईल. सरकारने डीएमध्ये चार टक्क्यांनी वाढ केल्यास 50  लाख कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना याचा लाभ मिळेल. सरकारी कर्मचाऱ्यांना दिलेला डीए हा त्यांच्या आर्थिक सहाय्य वेतन संरचनेचा भाग आहे.