आसाम पोलिसांचे मोठे यश; बंदी घातलेल्या 8 संघटनांमधील 644 अतिरेक्यांचे, 177 शस्त्रांसह आत्मसमर्पण
दहशतवाद्यांचे आत्मसमर्पण (संग्रहित संपादित प्रतिमा)

सतत बंडखोरीचा सामना करणाऱ्या आसाममध्ये (Assam) पोलिसांना मोठे यश आले आहे. गुरुवारी, राज्यात बंदी घातलेल्या 8 गटांमधील (Militant Groups) 644 अतिरेक्यांनी आपल्या 177 शस्त्रांसह आत्मसमर्पण केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उल्फा (I), एनडीएफबी, आरएनएलएफ, केएलओ, सीपीआय (माओवादी), एनएसएलए, एडीएफ आणि एनएलएफबीच्या सदस्यांनी एका कार्यक्रमात आसामचे मुख्यमंत्री सरबानंद सोनोवाल (Sarbananda Sonowal) यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले.

याबाबत बोलताना, पोलिस महासंचालक ज्योती महंता यांनी पत्रकारांना सांगितले की, 'हा दिवस आसाम पोलिसांसाठी महत्वाचा दिवस आहे. आज एकूण 644 कार्यकर्ते आणि आठ अतिरेकी गटांचे नेते शरण आले आहेत.' इतक्या मोठ्या प्रमाणावर अतिरेक्यांचे आत्मसमर्पण करणे हे राज्य पोलिसांसाठी मोठे यश मानले जात आहे.

या महिन्याच्या सुरूवातीला एनडीएफबीने आपले कामकाज संपुष्टात आणण्यासाठी, सरकारबरोबर त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी केली. करारानुसार एनडीएफबी म्होरक्या बी साओराईगवरा याच्यासह सर्व अतिरेकी हिंसक कारवाया थांबवतील आणि सरकारशी शांतता चर्चेत सहभागी होईल. त्रिपक्षीय करारात एनडीएफबी, केंद्र सरकार आणि आसाम सरकारचा समावेश होता. एनओडीएफबीचे अनेक सक्रीय सदस्य 11 जानेवारी रोजी म्यानमारहून भारतात आले. आता एनडीएफबीसह इतर सात गटांनीही अतिरेकी कारवाया थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा: 26 जानेवारीला होणाऱ्या दहशवादी हल्ल्याचा कट उधळला; जम्मू-काश्मीर पोलिसांकडून 5 दहशवाद्यांना अटक)

स्वातंत्र्यानंतर आसामसह संपूर्ण ईशान्य भागात बंडखोरी ही फार मोठी समस्या आहे. आसाममधील लोकसंख्येच्या 28% लोक 'बोडो' आहेत. हे लोक स्वत: ला आसामचे मूळ रहिवासी मानतात. या लोकांना अरुणाचलला लागून असलेला परिसर बोडोलँड घोषित करायचा आहे. बाहेरील लोक आसाममध्ये आल्यावर, इथल्या लोकांच्या जीवनमान व संस्कृतीवर परिणाम झाला आहे.

सध्या बोडो अतिरेकी संघटना नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलँड (एनडीएफबी) चा एक विभाग ठिकठिकाणी हिंसाचार पसरवत आहे. आदिवासी व मुस्लिम यांच्यापासून बोडो समुदायाचे संरक्षण करण्यासाठी, एनडीएफबीच्या एका विभागाला स्वतंत्र राज्य हवे आहे. सध्या राज्यात अल्फा, एनडीएफबीसह आसाममध्ये 35 हून अधिक अतिरेकी संघटना कार्यरत आहेत.