चार संशयीत ताब्यात (Photo Credit : ANI)

सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्या घराबाहेरुन चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. दिल्लीतील आलोक वर्मांच्या घराबाहेर हे चौघं रात्रीपासून फेऱ्या मारत होते, अशी माहिती मिळाली आहे.

ताब्यात घेतलेल्या चौघांकडेही इंटेलिजन्स ब्युरो अर्थात आयबीचं ओळखपत्र असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र अद्याप त्यांची ओळख पटलेली नाही. हे चौघंही आलोक वर्मा यांच्यावर पाळत ठेवत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हे चौघंही आलोक वर्मा यांच्या घराबाहेर एका कारमध्ये बसले होते. आलोक वर्मांचे घर अकबर रोडवर असून हा दिल्लीतील सर्वात सुरक्षित झोन समजला जातो.

सीबीआयच्या दोन ज्येष्ठ अधिकाऱ्यांमधील वाद उघडकीस आला आहे. सीबीआयचे संचालक आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने दोघांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. त्याचबरोबर इतर 13 अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. याप्रकरणी आलोक वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर केंद्रीय दक्षता आयोगाच्या सल्ल्यानुसार एसआयटी याबाबत सीबीआय अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे.