गोवा: सेल्फीचा मोह जीवावर बेतला; समुद्रकिनारी सेल्फी काढताना डॉक्टर महिलेचा मृत्यू
Representational Image (Photo Credits: pixabay)

सेल्फीने घेतलेले अनेक बळी आपल्या ऐकीवात आहेत. आता पुन्हा एकदा सेल्फीने एका डॉक्टर महिलेचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना गोव्याहून समोर आली आहे. समुद्रकिनारी सेल्फी काढत असताना या डॉक्टर महिलेचा मृत्यू झाला आहे. रम्या कृष्णा (25) असे या महिलेचे नाव असून ती मुळची आंध्रप्रदेश येथील होती.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, रम्यकृष्णा मित्रांसोबत गोव्याला फिरायला गेली होती. समुद्रकिनारी फिरत असताना रम्याकृष्णा सेल्फी काढत होती. पण तितक्यातच मागून मोठी लाट आली आणि रम्याकृष्णा खोलवर समुद्रात खेचली गेली. पोहता येत नसल्याने यात तिचा मृत्यू झाला. रम्यासोबत अजून एक मैत्रिणीही समुद्रात वाहत जात असताना तिला सुखरुप बाहेर काढण्यात स्थानिकांना यश आलं. रम्याकृष्णा हिचा मृतदेह गोवा पोलिसांनी ताब्यात घेतला असून स्थानिक रुग्णालयात तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

सेल्फीच्या मोहापायी जात असलेल्या बळींच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना पर्यटन स्थळी 'नो सेल्फी झोन' जाहीर करण्यात येतो. तसंच धोक्याच्या ठिकाणी सेल्फी न घेण्याचं आवाहनंही वारंवार करण्यात येतं. गेल्यावर्षी जून महिन्यात गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावरील 24 ठिकाणी 'नो सेल्फी झोन' जाहीर करण्यात आला होता.