आसाम पोलिसांकडून बनावट नोटा छापणाऱ्या फेक टोळीचा भंडाफोड; 25 ऑक्टोबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
अण्णासाहेब चवरे
|
Oct 25, 2020 11:35 PM IST
राज्य आणि देशभरात आज विजयादशमी म्हणजेच दसरा सण साजरा होत आहे. कोरोना व्हायरस संकटाचे सावट अद्यापही कायम असल्यामुळे दरवर्षीचा उत्साह यंदाच्या दसऱ्यात पाहायला मिळत नाही. तरीही नागरिक आपापल्या पद्धतीने सोशल डिस्टन्सींग आणि सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करताना दिसत आहेत. नागरिकांनी घरं सजवली आहेत. घरासमोर रांगोळी काढून, चौकटींना हार घातले आहेत. व्यवसायिक, दुकानदार आणि विविध संस्था संघटना यांनीही आपली अवजारं, शस्त्र पुजली आहेत. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा मुहूर्त असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे आज सोने खरेदी, गृहप्रवेश, गृह, वाहन अथवा महत्त्वाच्या वस्तू, खरेदी करण्यावर भर दिला जातो.
दरम्यान, परंपरेने साजरा होत असलेला दसऱ्यासोबतच राजकीय पक्षांचा दसराही खास असतो. त्यामुळे हे पक्ष संघटना यंदाचा दसरा कसा साजरा करतात याकडे विशेष लक्ष लागून राहिले आहे. गेल्या अनेक दशकांची परंपरा असलेला शिवसेना दसरा मेळावा यंदा कोरना व्हायरसच्या सावटामुळे अत्यंत साधेपणाने आणि केवळ 50 जणांच्या उपस्थितीत वीर सवरकर हॉल मुंबई येथे पार पडत आहे. शिवसेना दसरा मेळाव्याला मोठी परंपरा आहे. हा मेळावा नेहमी दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर होतो. शिवसेना या मैदानाला शिवतीर्थ असे म्हणते. मात्र, यंदा हा मेळावा अत्यंत साधेपणाने साजरा होत आहे. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान, दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सवही नेहमी मोठ्या उत्साहात साजरा होतो. परंतू, यंदा संघाचा उत्सवही अवघ्या 50 लोकांच्या उपस्थितीत साजरा केला जात आहे. या उत्सवात संघाचे सरसंघचालक मोहन भागवत काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यासोबतच भाजप नेत्या पंकजा मुंडे यासुद्धा गोपीनाथगडावरुन आपल्या मेळाव्यात भाषण करणार आहेत. त्यांचा मेळावाही डिजिटल पद्धतीने साजरा होणार असून, व्हर्च्युअल मेळाव्यात त्या काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हेसुद्धा आज 'मन की बात' या रेडीओ कार्यक्रमातून देशातील जनतेला संबोधित करणार आहेत.
दरम्यान, कोरोनाव व्हायरस, राजकारण, अर्थकारण, खेळ, उद्योग, कृषी, गुन्हे आणि यांसह विविध क्षेत्रातील ताज्या घटना घडामोडी तपशीलासह जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉग सोबत जोडलेले राहा.