Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 15, 2025
ताज्या बातम्या
29 minutes ago

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी तैनात असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलला कोरोना विषाणूची लागण; 21 एप्रिल 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या अण्णासाहेब चवरे | Apr 21, 2020 11:44 PM IST
A+
A-
21 Apr, 23:44 (IST)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी तैनात असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलला कोरोना विषाणूची लागण झाली आहे.

21 Apr, 23:19 (IST)

तबलीगी जमातचे प्रमुख मोहम्मद साद यांनी, कोरोना व्हायरस आजारातून बरे झालेल्या जमातीच्या लोकांना इतर लोकांच्या उपचारासाठी प्लाझ्मा डोनेट करण्याचे आवाहन केले आहे.

21 Apr, 22:30 (IST)

आज पुण्यात कोरोना विषाणूची 57 नवीन प्रकरणे आणि तीन मृत्यूची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आता एकूण संक्रमितांची संख्या 813 झाली आहे.

21 Apr, 21:39 (IST)

कोरोना विषाणूंच्या लक्षणांच्या प्रसाराबाबत नागरिकांकडून अभिप्राय गोळा करण्यासाठी, भारत सरकार टेलिफोनिक सर्वेक्षण करणार आहे. हे सर्वेक्षण एनआयसीमार्फत केले जाणार आहे आणि त्यासाठी 1921 या नंबर वरून कॉल्स येतील.

21 Apr, 20:52 (IST)

बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये आज 355 नवीन कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. अशाप्रकारे शहरातील एकूण सकारात्मक रुग्णांची संख्या 3445 झाली आहे. यापैकी आज 12 जणांचा मृत्यू झाला.

21 Apr, 20:10 (IST)

महाराष्ट्र आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आज 552 नवीन कोरोना व्हायरस प्रकरणे आणि 19 मृत्यूची नोंद झाली आहे. यासह राज्यात एकूण संक्रमितांची संख्या 5218 आणि मृत्यूंची संख्या 251 झाली आहे. यामध्ये आज रूग्णालयातून 150 रुग्णांना सोडण्यात आले असून, बरे झालेल्या रूग्णांची संख्या 722  झाली आहे.

21 Apr, 19:34 (IST)

नागपाड्यातील बेलासिस रोडवरील रिपन हॉटेलमध्ये आग लागल्याची माहिती मिळत आहे. अग्निशमनदल घटना स्थळी पोहोचले असून, कारवाई चालू आहे. येथे असलेल्या बहुतेक कोरोना ग्रस्त रुग्णांची सुटका करण्यात आली असून, शोध मोहीम सुरू असल्याची माहिती मुंबई फायर ब्रिगेडने दिली आहे.

21 Apr, 19:21 (IST)

लॉक डाऊन संदर्भात राज्य शासनाने 17 एप्रिल रोजी काढलेल्या सर्वसमावेशक अधिसूचनेतील नव्याने शिथिल केलेल्या बाबी रद्द करणारी दुरुस्ती आज करण्यात आली आहे. नागरिकांनी मुक्तपणे व्यवहार सुरु केल्याने शासनाने मुंबई-पुणे भागात लॉकडाऊन बाबतीत सवलती रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 

21 Apr, 18:48 (IST)

वृत्तपत्रांच्या घरोघरी डिलिव्हरीबाबतच्या आपल्या आदेशामध्ये महाराष्ट्र सरकारने बदल केला आहे. आता मुंबई महानगर प्रदेश, पुणे महानगर प्रदेश व कोरोना व्हायरस कंटेनमेंट झोन वगळता राज्यातील वृत्तपत्रांच्या घरोघरी डिलिव्हरीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र डिलिव्हरी देणाऱ्या व्यक्तीने मास्क घालणे तसेच इतर सुरक्षेचा उपायांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

21 Apr, 18:12 (IST)

कोरोना व्हायरसमुळे सुरु असलेले लॉक डाऊन 3 मे रोजी संपल्यास, 7 मे ते 7 जून या कालावधीतील उन्हाळी सुट्टी रद्द करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने घेतला आहे.

Load More

कोरोना व्हायरस संकटामुळे लागू करण्यात आलेला लॉकडाऊन कालपासून म्हणजेच 20 एप्रिल 2020 पासून काहीसा शिथिल करण्यात आला. शिथिल करण्यात आला म्हणजे पूर्ण हटवण्यात आला असे नाही. लॉकडाऊन सुरुच आहे. मात्र, यातील काही जीवनावश्यक दुकाने, उद्योग आदींना काम सुरु ठेवण्यास सशर्थ परवानगी देण्यात आली. काल या शितलतेचा पहिलाच दिवस होता. पहिल्या दिवस असल्याने उद्योग काहीसे गोंधळलेले दिसले. ज्यामुळे काही त्रांत्रिक अडचणी, आवश्यक परवानग्या आदी गोष्टी निर्माण झाल्या. परिणामी पहिल्या दिवशी उद्योग सुरु करायला अडचणी आल्या. दरम्यान, आज (मंगळवार, 21 एप्रिल 2020) काय होते याकडे राज्य आणि देशभरातील जनतेचे लक्ष लागले आहे. उद्योजक आपले उद्योग सुरु करतात का, त्याला कामगार वर्गाकडून पाठिंबा मिळतो का, खास करुन सरकारी यंत्रणा किती उत्सुकता दाखवतात वैगेरे गोष्टी आज महत्त्वपूर्ण असणार आहेत.

महाराष्ट्रात टाळेबंदीची कठोर अंमलबजावणी व्हावी यासाठी केंद्र सरकारची दोन पथकं आज महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. ही पथके मुंबई आणि पुणे शहरातील कोरोना व्हायरस स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवतील. आवश्यकता भासल्यास काही तातडीचे निर्णय घेण्याचेही अधिकार या पथकाला असल्याचे समजते. केंद्रीय गृहमंत्रालयाने असे पथक महाराष्ट्रात पाठविण्याबाबत सोमवारी घोषणा केली आहे. त्यामुळे ही पथकं आता काय निर्णय घेतात याबाबतही उत्सुकता आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. शेवटची अपडेट हाती आली तेव्हा राज्यात कोरोना व्हायरस बाधित नव्या 466 रुग्णांसह राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 4666 इतकी झाली आहे. राज्यात आतापर्यंत 232 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 572 जणांना उपचारानंतर प्रकृती सुधारल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे.  त्यामळे लॉकडाऊन काळात उद्योग, व्यवसायांना दिलेली सशर्थ शिथीलता, राज्य, देश आणि जगभरातील कोरोना व्हायरस अपडेट्ससह देशांतर्गत राजकारण, कृषी, आरोग्य, समाज, संस्कृती यांसह विविध विषय आणि क्षेत्रातील ताज्या आणि ठळक घडामोडी जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉगसोबत जोडलेले राहा.


Show Full Article Share Now