2-DG Drug: कोरोनाचे स्वदेशी औषध 2-डीजी कधी येईल बाजारात? काय असेल किंमत? Dr. Reddys ने दिली महत्वाची माहिती
2-DG Drug (संग्रहित संपादित प्रतिमा)

सध्या देशात कोरोना व्हायरस (Coronavirus) विरूद्ध मोठा लढा सुरू आहे. एकीकडे ऑक्सिजन, बेड्सची व्यवस्था केली जात आहे तर दुसरीकडे लसीकरण मोहीमदेखील सुरु आहे. अशात सोमवारी संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDP) च्या वतीने, डॉ. रेडडीज लॅबोरेटरीजच्या (Dr. Reddys Laboratories) सहकार्याने विकसित कोरोना ड्रग 2-डीजीला (2-deoxy-D-glucose) (2DG) आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आली. आज या औषधाबद्दल डॉ रेडडीज प्रयोगशाळांद्वारे महत्वाची माहिती देण्यात आली आहे. मे ते ऑक्टोबर 2020 दरम्यान घेण्यात आलेल्या चाचण्यामध्ये हे औषध कोविड रूग्णांसाठी सुरक्षित असल्याचे आढळले आहे.

हैदराबाद येथील फार्मा कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या सहकार्याने, डीआरडीओ प्रयोगशाळेतील न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्सेस (INMAS), नवी दिल्ली यांनी 2-डीजी विकसित केले आहे. 2 डीजी हे एक तोंडावाटे घेतले जाणारे अँटी-व्हायरल औषध आहे, जे केवळ रुग्णालयात दाखल असलेल्या मध्यम ते गंभीर कोविड-19 रूग्णांना सहाय्यक औषधोपचार म्हणून दिले जाऊ शकते.

डॉ. रेडडीजद्वारे आज सांगण्यात आले आहे की, 2DG ड्रग अद्याप सुरू झाले नाही. हे औषध जूनपर्यंत बाजारात येण्याची शक्यता आहे. डॉ. रेड्डी यांच्या वतीने असेही म्हटले आहे की, हे औषध बाजारात येण्यापूर्वी त्याबाबतच्या कोणत्याही संदेशापासून सावध रहा. सोशल मीडियावर 2 डीजी विकण्याचे दावे खोटे आहेत. (हेही वाचा: कोरोनावर उपचार करण्यासाठी DRDO चे औषध 2-DG चा वापर केला जाणार; DGCI ने आपत्कालीन वापरास दिली मंजुरी)

डॉ. रेडडीजनी असेही म्हटले आहे की, या औषधाची किंमत किती असेल हे अद्याप ठरलेले नाही. येत्या काळात त्याची किंमत निश्चित केली जाईल. डॉ. रेड्डीद्वारे निवेदनात पुढे म्हटले आहे की, सर्वांच्या आवाक्यात असेल अशीच या औषधाची किंमत ठरवली जाईल. त्याची घोषणा लवकरच होईल.

शेवटी ते म्हणतात, सध्या 2 डीजीच्या नावावर खोटे किंवा बेकायदेशीर उत्पादने विकणाऱ्या एजंट्सबाबत आणि सोशल मीडिया व व्हॉट्सअ‍ॅपवर प्रसारित होत असलेल्या 2DG संबंधित दिशाभूल करणाऱ्या संदेशांबद्दल सावधगिरी बाळगा.