पोलिसांनी ताब्यात घेतलेली गाडी (Photo Credit : Twitter)

केंद्र सरकारने वाहतुकीच्या नियमात बदल करत, 1 सप्टेंबर 2019 पासून देशभरात वाहतुकीचे नवे नियम (New Traffic Rules) लागू केले. सरकारने नव्या मोटार वाहतूक कायद्यातील 63 तरतुदी लागू करण्यासंदर्भात, काढण्यात आलेल्या एका अधिसूचनेनुसार त्यानुसार देशात वाहतुक कायदा राबवला जात आहे. या नव्या नियमांनुसार जर का तुम्ही वाहतुकीचे नियम मोडले तर तुम्हाला भलामोठा दंड भरावा लागू शकतो. अशीच एक घटना गुजरात राज्यात घडली आहे, ज्यामध्ये एका कारसाठी दंड म्हणून तब्बल 9.80 रुपये वसुल केले गेले आहेत.

अहमदाबाद पोलीस ट्वीट -

अहमदाबाद पोलिसांनी याबाबत ट्वीट करत ही माहिती दिली आहे. अहमदाबाद शहरात पोलिसांची रुटीन तपासणी चालू होती. या दरम्यान पोलिसांनी एका पोर्श 911 (Porsche 911) गाडी ताब्यात घेतली. या गाडीची नंबरप्लेट नव्हती तसेच आवश्यक ती कागदपत्रेही नव्हती. चौकशी केल्यानंतर वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल, पोलिसांनी या गाडीच्या चालकाला तब्बल 9.80 लाखाचा दंड ठोठावला. भारताच्या इतिहासातील वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल झालेल्या हा सर्वात जास्त दंड आहे. (हेही वाचा: सावधान! वाहतुकीचे नियम मोडल्यास चालकाचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द)

याबाबत बोलताना पोलिस उपायुक्त तेजस पटेल म्हणाले की, ‘नंबर प्लेट नसल्यामुळे वाहतूक पोलिसांनी बुधवारी अहमदाबादच्या हेलमेट चौकात सिल्व्हर रंगाची गाडी थांबविली. विचारणा केली असता वाहन चालकाकडे कागदपत्रे नव्हती. म्हणून आम्ही कार ताब्यात घेतली आणि मोटर वाहन कायद्यांतर्गत आरटीओ मेमो जारी केला. याचा अर्थ असा की, आरटीओकडे दंड जमा करावा लागेल आणि गाडी परत मिळविण्यासाठी पावती घेऊन यावे लागेल तेव्हाच ही गाडी मिळू शकते.’