
2001 Indian Parliament Attack Anniversary : 13 डिसेंबर 2001 रोजी नवी दिल्लीमध्ये 'न भूतो न भविष्यति' अशी घटना घडली. अंगाचा थरकाप उडविणा-या या घटनेत भारतातील संसेदवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. भारताच्या लोकतंत्राचे मंदिर समजल्या जाणा-या संसदेत झालेला हा हल्ला आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जवानांचा मृत्यू हा संपूर्ण देशासाठी धक्कादायक बाब होती. या संपूर्ण अतिरेकी कारवाईचा मास्टर माईंड अफजल गुरु (Afzal Guru) या अतिरेक्याला 15 डिसेंबर 2001 मध्ये जम्मू-काश्मीर येथून अटक करण्यात आली. हा हल्ला भारतीय संविधानाला धक्का पोहोचविणारा होता. या हल्ल्यात 5 दिल्ली पोलीसचे जवान, 2 संसदेचे सेक्युरिटी गार्ड शहीद झाले होते.
या घटनेला आज 18 वर्षे पूर्ण होत असली तरीही त्याच्या आठवणी, ती भीती अजूनही लोकांच्या मनात घर करुन आहे. जाणून घेऊया या हल्ल्याविषयी काही खास गोष्टी:
1) लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मुहम्मद चे 5 आतंकवाद्यांनी 13 डिसेंबर 2001 रोजी सकाळी 11.40 वाजता अॅम्बेसेडर मधून संसद परिसरात प्रवेश केला. ते येण्यासाठी 40 मिनिटांपूर्वी लोकसभा आणि राज्यसभा स्थगित झाली होती. त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण आडवाणी यांच्यासह 100 नेते त्यावेळी संसदेत उपस्थित होते.
2) महिला कॉन्स्टेबल सर्वात आधी पाहिले होते अतिरेक्यांना
संसदेत हे अतिरेकी प्रवेश करत असताना सर्वात आधी CRPF कॉन्स्टेबल कमलेश कुमारी हिने पाहिले होते. त्यावेळी तिने प्रसंगावधान दाखवत त्वरित अलार्म वाजवला. अतिरेक्यांच्या हे लक्षात येताच त्यांनी तिच्यावर गोळीबार करत तिला ठार केले.
3) 'या' पोलीस कर्मचा-यांनी तसेच जवानांनी लावली होती प्राणांची बाजी
दिल्ली पोलिसचे जवान नानक चंद, रामपाल, ओमप्रकाश, बिजेंद्र सिंह आणि घनश्याम तथा केंद्रीय रिजर्व पोलीस बलाची महिला कॉन्स्टेबल कमलेश कुमारी आणि संसद सुरक्षेचे 2 सुरक्षा सहायक जगदीश प्रसाद यादव आणि मातबर सिंह नेगी यांनी या हल्ल्यात प्राणांची आहुती दिली.
4) अतिरेकी हल्ल्याचा मास्टरमाईंड अफजल गुरु कधी मिळाली फाशी
हल्ल्यानंतर 2 दिवसात अटक केलेल्या अफजल गुरु ला फाशीची शिक्षा मिळण्यासाठी देशाला 12 वर्षे वाट पाहावी लागली. 9 फेब्रुवारी 2013 ला तिहार जेलमध्ये त्याला फाशी देण्यात आली.
5) अफजल गुरु हा जम्मू-काश्मीरचा असल्यामुळे आपल्याला फाशीची शिक्षा मिळणार नाही असे त्याला वाटत होते. मात्र 3 फेब्रुवारी 2013 ला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अफजल गुरुची ही याचिका फेटाळली आणि 9 फेब्रुवारी 2013 ला फाशी देण्यात आली.
देशाची राजधानी दिल्लीत संसदेवर झालेला हल्ला हा खूपच लज्जास्पद आणि भारतीय सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा होता. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या जवानांना लेटेस्टली मराठीकडून भावपूर्ण श्रद्धांजली.