जालोरमध्ये नात्याला काळिमा; पोटच्या मुलीला साखळदंडाने बांधून पित्याचा अनेकवेळा बलात्कार
Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: File Image)

हैद्राबाद येथे एका डॉक्टर युवतीवर झालेल्या बलात्काराच्या (Rape) घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे. तळागाळातून या घटनेबाबत निषेध नोंदविला जात आहे. अशात राजस्थानमधील (Rajasthan)  17 वर्षांच्या मुलीवरील बलात्काराच्या घटनेने त्यात भर घातली आहे. जालोर जिल्ह्यातील बागोड़ा पोलिस स्टेशन भागातील, एका गावात मुलीने आपल्या वडिलांवर बलात्काराचा आरोप केला आहे. वडिलांनी आपल्याला साखळ्यांनी बांधून  बलात्कार केला असल्याचे तिचे म्हणणे आहे. पीडितेने आरोपी वडिलांच्या तावडीतून कशीतरी स्वतःची सुटका करून घेतली ब ती आपल्या मामाच्या घरी पोहचली. त्यानंतर आरोपीविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला.

पीडितेने केलेल्या आरोपांमध्ये म्हटले आहे की, या मुलीच्या वडिलांनी बलात्कारासोबत तिला मारहाणदेखील केली आहे. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता ही पिडीता रडत आपल्या मामाच्या घरी पोहचली. त्यावेळी तिच्या पायात लोखंडी साखळ्या होत्या. आपले वडील रात्री जबरदस्तीने आपल्याला स्वतःजवळ झोपवून घेतात आणि आपल्यावर बलात्कार करतात असे या मुलीने सांगितले. त्यानंतर मामाच्या मदतीने तिने पोलिसांकडे तक्रार नोंदवली.

(हेही वाचा: धक्कादायक! नराधम पित्याचा पोटच्या मुलीवर 2 वर्षे बलात्कार; नकार दिल्यावर हत्या करून शरीराचे केले दोन तुकडे)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वडिलांचे आपल्या कुटुंबातील एका महिलेशी अवैध संबंध होते. मुलीने त्या दोघांना नको त्या अवस्थेत पहिले. त्यानंतर आपले अवैध संबंध लपविण्यासाठी आरोपी वडील व ती महिला मुलीला साखळदंडाने बांधायचे व वडील मुलीला मारहाण करून बलात्कार करायचे. आता पीडितेचे मेडिकल केले जाईल. त्यानंतर घटनेची वास्तविक माहिती मिळाल्यावर पोलिसांकडून पुढील कारवाई केली जाईल.