AIMIM Leader Waris Pathan (Photo Credits: ANI)

हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्षाचे एआयएमआयएमचे (AIMIM), राष्ट्रीय प्रवक्ते वारिस पठाण (Waris Pathan) यांनी अत्यंत वादग्रस्त विधान केले आहे. कर्नाटकच्या गुलबर्गा (Gulbarga) येथे जाहीर सभेला संबोधित करताना वारिस पठाण म्हणाले की, 'आम्ही 15 कोटी, 100 कोटींवर भारी पडू’

कोणाचेही नाव न घेता पठाण यांनी मारलेला हा टोला अनेकांना लागला आहे. त्याच सोबत पठाण पुढे म्हणाले, ‘जर स्वातंत्र्य दिले नाही तर ते हिसकावून घ्यावे लागले; पठाण यांच्या या वक्तव्यानंतर राजकारण तापले आहे.

पहा व्हिडिओ -

वारिस पठाण हे मुंबईच्या भायखळाचे आमदार आहेत. त्यांच्या या आजच्या गुलबर्गा सभेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या सभेत ते पुढे म्हणाले, ‘विटांचे उत्तर दगडाने द्यायला आम्ही शिकलो आहोत. पण आपण एकत्र चालणे आवश्यक आहे. जर स्वातंत्र्य दिले गेले नाही, तर ते आपल्याला हिसकावून घ्यावे लागेल. आम्ही बायकांना पुढे केले, असा आरोप आमच्यावर केला. मात्र लक्षात घ्या आता फक्त सिंहनी बाहेर आल्या आहेत तरी तुम्हाला घाम फुटला. आम्ही सर्वजण एकत्रित आल्यास काय होईल हे आपण समजू शकता. आम्ही 15 कोटी 100 कोटींवर भारी पडू.’ (हेही वाचा: कर्नाटक: लिंगायत मठाचा मोठा निर्णय; दीवान शरीफ रहमानसाब मुल्ला ही मुस्लिम व्यक्ती होणार मुख्य पुजारी)

याआधी 5 फेब्रुवारी रोजी पठाण यांनी कबूल केले की, आपण मुंबईच्या नागपाडा भागात, शाहिन बागेसारखा निषेध आयोजित केला होता. त्यानंतर यावर विहिंपने बरीच टीका केली होती. दुसरीकडे मौलवी यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली होती. अशा गोष्टींमुळे समाजात द्वेष निर्माण होतो असे त्यांचे म्हणणे होते. यापूर्वी, असदुद्दीन ओवैसी यांचे भाऊ अकबरुद्दीन ओवैसी यांनी, 2013 मध्ये म्हटले होते की, 'आम्ही 25 कोटी आहोत, तर तुम्ही 100 कोटी. 15 मिनिटांसाठी पोलिसांना हाताव आणि पहा कोणामध्ये किती दम आहे.’ ओवैसी यांच्या त्या वक्तव्यानंतरही मोठा गदारोळ माजला होता.