कर्नाटक मधील ते 14 बंडखोर आमदार ठरले अपात्र, विधानसभा अध्यक्षांचा निर्णय; उद्या BS Yediyurappa यांचा विश्वास दर्शक ठराव
Karnataka Assembly Speaker KR Ramesh Kumar (Photo Credits: IANS/File)

कर्नाटक (Karnataka) राज्यात चालत असलेला सत्तांतरणाचा संघर्ष आता मध्यावर येऊन ठेपला आहे. माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी (HD Kumaraswamy) विश्वासदर्शक ठराव मांडू शकले नाहीत, त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. आता उद्या येडीयुरप्पा (BS Yediyurappa) विश्वासदर्शक ठराव सादर करणार आहेत, त्याला सर्व आमदारांनी उपस्थित राहावे असे सांगण्यात आले आहे. मात्र आता विधानसभा अध्यक्षांनी येडीयुरप्पा यांना मोठा दणका दिला आहे. विधानसभेत बंड करणारे काँग्रेस, जेडीएसच्या 14 आमदारांना विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश कुमार (KR Ramesh) यांनी अपात्र ठरवले आहे.

या निर्णयामुळे कर्नाटक विधानसभा सदस्यांची संख्या 208 झाली आहे, मात्र यात भाजप बाजी मारेल अशी चिन्हे दिसत आहेत. येडीयुरप्पा यांना विश्वास दर्शक ठरावासाठी 104 मतांची गरज आहे. यामध्ये एकूण 207 सदस्य मतदान करणार आहेत. सध्या भाजपाकडे 105 अधिक एक, काँग्रेसकडे 66, जेडीएसकडे 34 तर बसपाचा एक सदस्य आहे. नुकतेच येडीयुरप्पा यांनी चौथ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे, त्यामुळे हा विश्वासदर्शक ठराव त्यांच्या बाजूने लागणे फार महत्वाचे आहे. (हेही वाचा: कर्नाटक मुख्यमंत्री कुमारस्वामी बहुमत सिद्ध करण्यात अपयशी; काँग्रेस-जेडीएस चं सरकार कोसळलं)

काँग्रेस आणि जेडीएसच्या या 14 आमदारांना 2023 पर्यंत अपात्र ठरविल्याचा आदेश रमेश कुमार यांनी दिला आहे. कुमारस्वामी सरकारच्या विश्वासदर्शक ठरावामध्ये 99 आमदारांनी त्यांच्या बाजूने, तर 105 आमदारांनी सरकारच्या विरोधात मतदान केले होते. दरम्यान एका ज्योतिष्याने सांगितल्यामुळे कुमारस्वामी यांनी विश्वासदर्शक ठरावाचा दिवस मंगळवार निवडला होता असे बोलले जात आहे. मात्र तरी कुमारस्वामी सरकार कोसळलेच. आता उद्या येडीयुरप्पा यांच्या विश्वासदर्शक ठरावावेळी काय घडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.