Uber | (File Image)

Uber ने आज (2 एप्रिल) ‘Uber for Teens’  या नव्या सर्व्हिसची भारतामध्ये घोषणा केली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ही सर्व्हिस 13-17 वर्षातील मुलांचा प्रवास सुरक्षित आणि खात्रीशीर ट्रान्सपोर्टेशन द्वारा करण्यासाठी लॉन्च केली जाणार आहे. देशात ही सेवा 37 शहरांमध्ये लॉन्च केली जाणार आहे. यामध्ये दिल्ली एनसीआर, मुंबई, बेंगलूरू, हैदराबाद, चैन्नई, कोलकाता शहरांचा समावेश आहे. यामध्ये सुरक्षेचे कडक प्रोटोकॉल आहेत. त्यामध्ये जीपीएस ट्रॅकिंग, रिअल टाईम राईड ट्रॅकिंग, अ‍ॅप मधील इमरजन्सी  बटण यांचा समावेश आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, "किशोरवयीन मुले आणि त्यांचे पालक दोघांनाही सेवा वापरताना सुरक्षित वाटावे यासाठी हे केले जात आहे," असा दावा कंपनीने केला आहे.

‘Uber for Teens’ चे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ते पालकांना त्यांच्या मुलांच्या बुक केलेल्या राईड्सवर देखरेख करण्याची परवानगी देते. पालक एक टीन्स अकाउंट तयार करू शकतात, ज्यामुळे ते त्यांच्या किशोरवयीन मुलांच्या वतीने राईड्सची विनंती करू शकतात, रिअल-टाइममध्ये राईड्सचा मागोवा घेऊ शकतात आणि ट्रिपनंतर तपशीलवार राईड सारांश देखील मिळवू शकतात.

‘Uber for Teens’ मध्ये सुरक्षेचा एक अतिरिक्त स्तर जोडला जातो, ज्यामुळे पालकांना त्यांच्या किशोरवयीन मुलांच्या प्रवासाचे निरीक्षण करणे सोपे होते. "आम्ही भारतातील किशोरवयीन मुलांना आणि त्यांच्या कुटुंबियांना भेडसावणाऱ्या अनोख्या वाहतूक आव्हानांना ओळखतो. ‘Uber for Teens’ सह, पालकांना विश्वास वाटेल अशी सेवा प्रदान करून आम्ही या आव्हानांना तोंड देण्यासाठी वचनबद्ध आहोत आणि किशोरवयीन मुलांना वापरण्यास सोपी आणि रंजक वाटेल," असे उबर इंडिया आणि साउथ एशियाचे अध्यक्ष प्रभजीत सिंग म्हणाले आहेत.