Delhi: फोर्टिस रुग्णालयाचा निष्काळजीपणा! हिप बोन फ्रॅक्चर झालेल्या रुग्णाचं डॉक्टरांनी केलं हृदयाचे ऑपरेशन; रुग्णाचा मृत्यू
Death (Image used for representational, purpose only) (Photo Credits: PTI)

Delhi: नोएडा (Noida) येथील फोर्टिस रुग्णालयातील (Fortis Hospital) डॉक्टरांवर उपचारात निष्काळजीपणा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. फोर्टिस रुग्णालयात हिप बोनमध्ये फ्रॅक्चर झाल्याने रुग्णाला दाखल करण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी हृदयाचे ऑपरेशन केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तथापी, रुग्णाला आधीच हृदयविकार असल्याचे रुग्णालय व्यवस्थापनाने म्हटलं आहे. रुग्णाची प्रत्येक अपडेट नातेवाईकांना दिली जात होती. जयपूरचे रहिवासी दिनेश कुमार सक्सेना (66) यांचे पडल्यामुळे हीप बोन फ्रॅक्चर झाले होते. राजस्थानमधील डॉक्टरांच्या संपामुळे तेथे त्याच्यावर उपचार होऊ शकले नाहीत, म्हणून त्यांनी रुग्णाला नोएडाला आणलं होतं. (हेही वाचा - Telangana Shocker! पत्नीच्या आत्महत्येनंतर तेलंगणातील पोलिस अधिकाऱ्याची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या)

प्राप्त माहितीनुसार, शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मंगळवारी रुग्णाची अँजिओग्राफी करण्यात आली. मृताचा मुलगा शुभम सक्सेना याने सांगितले की, त्याच्या वडिलांची यापूर्वी दोनदा अँजिओप्लास्टी झाली होती. बुधवारी सकाळपर्यंत त्यांची प्रकृती ठीक होती. सकाळी त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली.

डॉक्टरांनी कोणतीही माहिती दिली नसल्याचा आरोप शुभमने केला आहे. दुपारी 4.30 च्या सुमारास तो आयसीयूमध्ये पोहोचला तेव्हा त्याचे वडील बेशुद्ध पडले होते. संशयावरून डॉक्टरांना विचारणा केली असता, सायंकाळी पाचच्या सुमारास रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. नातेवाईकांनी 112 वर फोन करून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रकरण शांत केले. नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत रुग्णालयावर कारवाईची मागणी केली.

दरम्यान, रूग्णाला आधीच हृदय आणि श्वसनाचे आजार असल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. त्याची साखर जास्त होती. हिप शस्त्रक्रिया करण्यापूर्वी, रुग्णाची स्थिती स्थिर करणे आवश्यक होते. रुग्णाशी संबंधित प्रत्येक अपडेट नातेवाईकांना देण्यात येत होते. उपचारात कोणताही निष्काळजीपणा झाला नाही. कुटुंबीयांचा आरोप निराधार असल्याचं रुग्णालय प्रशासनाने म्हटलं आहे.