लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेच पालन आणि कठोर कारवाई होताना दिसत आहे. अशात नरेंद्र मोदींच्या नावाने सुरू झालेल्या ‘नमो टीव्ही’ (NaMo TV) ला निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. निवडणुका काही दिवसांवर आल्या असताना 31 मार्चला हे चॅनल सुरु झाले. या चॅनलला परवानगी दिलीच कशी? अशी तक्रार आप आणि कॉंग्रेस पक्षाने केली होती. आता निवडणूक आयोगाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला याबद्दल जाब विचारला आहे. नमो टीव्हीचा वापर राजकीय प्रचारासाठी करण्यात येत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने या वाहिनीच्या प्रसारणावर बंदी घालावी अशी मागणीदेखील करण्यात आली आहे.
याबाबत उत्तर देताना, नमो टीव्ही हे न्यूज चॅनल नसून जाहीरात आहे. हे परवाना असलेले चॅनल नाही तर डायरेक्ट टू होम चॅनल आहे, यासाठी परवानगीची गरज नाही. चॅनलचा संपूर्ण खर्च संबंधित पार्टी म्हणजेच भारतीय जनता पार्टी करत आहे. असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने म्हटले आहे.
निवडणूक आयोगाने दूरदर्शनला असेच पत्र पाठवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'मैं भी चौकीदार' कार्यक्रम लाईव्ह दाखवल्याने निवडणूक आयोगाने दूरदर्शनला नोटीस जारी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 मार्चला देशाच्या 500 ठिकाणांवरील लोकांना संबोधित केले होते. हा कार्यक्रम 31 मार्चला प्रसारित करण्यात आला होता. (हेही वाचा: रेल्वे आणि विमानसेवा कंपनीकडून आचारसंहितेचा भंग; निवडणूक आयोगाकडून रेल्वे, उड्डाण मंत्रालयाला कारवाईचे आदेश)
नुकतेच फेसबुकने कॉंग्रेसशी संबंधित 687 पेजेस हटवली आहेत. असे असताना ‘नमो टीव्ही’वर फक्त बीजेपीची जाहिरात केली जात आहे, यावर इतर पक्षांनी आक्षेप घेतला आहे. दरम्यान, बोर्डिंग पास, तिकिटांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापल्याने निवडणूक आयोगाने रेल्वे बोर्डचे संचालक आणि नागरी उड्डाण मंत्रालयाचे सचिव यांना पत्र लिहिले आहे.