जळत्या निखाऱ्याने चारित्र्याचा पाठपुरावा कर, सासरच्या मंडळींची विचित्र मागणी
फोटो सौजन्य- Pixabay

मथुरेमध्ये तंत्र- मंत्रावर विश्वास ठेवणाऱ्या सासरच्या मंडळींनी सुनेला तिचे सतीत्व खरे आहे की नाही हे पाहायचे होते. त्यासाठी सासरच्या मंडळींनी सुनेला चक्क हातांवर जळते निखारे ठेवण्यास सांगितल्याची विचित्र घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये पीडित महिलेच्या हाताची बोटे गंभीरपणे जळाली आहेत.

मथुरेतील एका गावात विवाहित महिलेला लग्नानंतर काही दिवसात नवऱ्याने तिच्या चारित्र्यावरुन संशय घेण्यास सुरुवात केली.तसेच नवरा सासरच्या  मंडळींसमोर या कारणावरुन तिला मारहाण ही करत असे. मात्र महिलेने वारंवार तुम्ही समजत आहात ते खोटे आहे असे सांगण्याचा प्रयत्नही केला होता. तरीही बायकोला न जुमानता नवऱ्याने गावातील एका तांत्रिक महिलेकडून तिच्या चारित्र्याची परिक्षा घेण्यास ठरविले. या घटनेप्रकरणी महिलेने विरोध केला असता तिला पुन्हा सासरच्या मंडळींनी मारहाण केली. तसेच त्यांनी गावात भरलेल्या पंचायतीसमोर सुनेला तिच्या चारित्र्याची परिक्षा देण्यास भाग पाडले. तर ही परिक्षा देण्यासाठी सुनेला हातावर चक्क जळते निखारे ठेवून ती पवित्र असल्याचे सर्वांसमोर मान्य करण्यास सांगितले.

यावेळी पीडित महिलेचा नवरा आणि सासरची मंडळीसुद्धा तेथे उपस्थित होते. तसेच जो पर्यंत तेथे उपस्थित असलेली मंडळी तिच्या चारित्र्यावर निकाल देत नाही तोपर्यंत तिला हे सर्व सहन करावे लागले. या घटनेची पोलिसात तक्रार केली असता पोलिसांनी  सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.