शिल्पा शेट्टी (Photo credit : Instagram)

Guinness World Record : गिनीज विश्वविक्रमामध्ये आतापर्यंत भारताची अतिशय चांगली कामगिरी राहिली आहे. आता यामध्ये अजून एका विक्रमाची भर पडली आहे. नुकतेच अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या नेतृत्वाखाली तब्बल 2 हजार 353 जणांनी सलग 60 सेकंद पोटाच्या प्लँक स्थितीत राहण्याचा विक्रम केला आहे. बजाज अलायन्झ लाइफ इन्शुरन्स कंपनीने, पुण्याच्या आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजच्या मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

18 मार्च 2017 रोजी चीनने या विक्रमाची नोंद आपल्या नावावर केली होती. यामध्ये 1,779 लोक सहभागी झाले होते. आता भारताने चीनचा हा विक्रम मोडला आहे. याबाबत आपले मत व्यक्त करताना शिल्पा शेट्टी म्हणाली, ‘फिटनेसबाबतीत जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि यात बदल घडवण्यासाठी मी नेहमीच तत्पर असणार आहे. फिटनेस आरोग्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे फिटनेसची कास धरणाऱ्या प्रत्येकाची मी मदत करेन.’

सकाळी 6 वाजता या कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. त्यावेळी मैदानावर तब्बल 2000 लोक उपस्थित होते. वॉर्मअप झाल्यानंतर शिल्पाने स्वतः प्लँक कसे करतात हे दाखवले आणि त्यानंतर इतरांनी ते केले. शिल्पा स्वतः या प्लँक स्थितीत तब्बल 2 मिनिटे राहू शकते.