Gold Smuggling in Jaipur: भारतात अशी अनेक विमानतळे आहेत जिथे सोन्याच्या तस्करीची प्रकरणे वारंवार समोर येत असतात. मात्र, शुक्रवारी जयपूर (Jaipur) मध्ये घडलेल्या या प्रकरणामुळे तपास अधिकारी हैराण झाले आहेत. जयपूर विमानतळावर एक व्यक्ती त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लपवून ठेवलेले सोने घेऊन जात होता. आरोपीला अटक केल्यानंतर कस्टम अधिकाऱ्यांनी सोने जप्त केले आहे.
प्रायव्हेट पार्टमध्ये लपवले होते सोने -
विमानतळावर तैनात तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपी प्रवासी शुक्रवारी 23 एप्रिल रोजी एअर अरेबियाच्या विमानाने जयपूरला पोहोचला होता. तो काहीतरी लपवत असल्याचे त्याच्या कृतीतून दिसत होते. संशयावरून त्याची झडती घेण्यात आली. त्याने गुदाशयात सुमारे दोन पौंड सोने लपवले होते. (हेही वाचा - Crime: ब्रेकअपनंतरही बहिणीसोबत होते संबंध, भडकलेल्या भावाने केली तरुणीच्या प्रियकराची हत्या)
791 ग्रॅम सोने जप्त -
झडतीदरम्यान, आरोपीच्या गुदाशयात पांढऱ्या प्लास्टिकमध्ये गुंडाळलेल्या पॉलिथिलीनच्या तीन पारदर्शक कॅप्सूल सापडल्या, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. कॅप्सूलच्या आतून सोने बाहेर आले. अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या सोन्याची भारतीय बाजारपेठेत किंमत 42,79,310 रुपये आहे. ते 99.50 टक्के शुद्धतेचे 791 ग्रॅम सोने होते. संशयित तस्कराला अटक करण्यात आली असून घटनेची कसून चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
विगमध्ये लपवले होते सोने -
या घटनेच्या काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अशाच एका तस्कराला पकडण्यात आले होते. ज्याने आपल्या विगमध्ये 30,43,912 रुपयांहून अधिक किमतीचे सोने लपवले होते. सीमाशुल्क आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, गुन्हेगार अबुधाबीहून आला होता. 2 एप्रिल रोजी जयपूर रेल्वे स्थानकावर एका तस्कराला पकडण्यात आले, ज्याच्या खाजगी भागातून सोन्याची सहा बिस्किटे जप्त करण्यात आली.
भारतीय सीमाशुल्क कार्यालयाच्या अहवालानुसार, जानेवारी 2011 च्या सुरुवातीपासून ते या वर्षाच्या सुरुवातीपर्यंत भारतीय विमानतळांवर तस्करांकडून सुमारे तीन टन सोने जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणांमध्ये 324 परदेशींसह सुमारे 1,632 लोकांना अटक करण्यात आली आहे.