पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडकवला तिरंगा; शहीद झालेल्या पोलिसांना वाहिली श्रद्धांजली
शहिदांना श्रद्धांजली वाहताना पंतप्रधान (Photo Credit-Twitter)

‘राष्ट्रीय पोलिस मेमोरियल दिवसा’निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय पोलिस स्मारक (एनपीएम) चे राजधानी दिल्ली येथे उद्घाटन केले. यावेळी पीएम मोदींनी गृहमंत्री राजनाथ सिंह आणि वरिष्ठ भाजपा नेते लालकृष्ण आडवाणी यांच्यासह दिल्लीच्या लाल किल्ल्यावर शहीद पोलिसांना श्रद्धांजली वाहिली. या प्रसंगादरम्यान शहीद झालेल्या पोलिसांच्या आठवणीने पंतप्रधान थोडे भावूक झाले. राष्ट्रीय पोलिस मेमोरियल दिवस हा 1959 मध्ये लद्दाखच्या स्प्रिंग क्षेत्रात चिनी ट्रुप यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या पोलिसांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी साजरा केला जातो.

यावेळी पीएम मोदी म्हणाले, 'हे माझे सौभाग्य आहे की मला राष्ट्र सेवा आणि समर्पणाच्या अमर गाथेचे प्रतीक, राष्ट्रीय पोलिस मेमोरियलला देशाला समर्पित करण्याची संधी मिळाली आहे'. ते पुढे म्हणाले, ‘देशाच्या सुरक्षेसाठी समर्पित असलेली प्रत्येक व्यक्ती, इथे उपस्थित असलेल्या शहीदांचे कुटुंबियांना मी पोलिस स्मरण दिवसानिमित्त अभिवादन करतो.’

याचवेळी ‘आझाद हिंद सरकार'च्या 75व्या जयंतीनिमित्त आज लाल किल्ल्यावर ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. 75 वर्षांपूर्वी म्हणजे 21 ऑक्टोबर 1943 रोजी सुभाषचंद्र बोस यांनी 'आझाद हिंद सरकार'ची स्थापना केली होती. 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची परंपरा आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही परंपरा मोडून आज वर्षातून दुसऱ्यांदा तिरंगा फडकवला आहे. इतकेच नाही तर सुभाष चंद्र बोस आणि आझाद हिंद सेनेच्या आठवणी ताज्या करण्यासाठी पंतप्रधान मोदी अंदमान-निकोबार येथेही जाणार आहेत.

या प्रसंगी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलातील (एनडीआरएफ) जवानांसाठी आता प्रत्येक वर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त (23 जानेवारी) त्यांच्या नावाच्या पुरस्काराने सन्मानित केले जाणार असल्याची घोषणा केली.