Coronavirus: देशातील ईशान्य भागात वैद्यकीय उपकरणे व आपत्कालीन वस्तू पुरवण्यासाठी खास मालवाहू विमाने चालविण्यास मान्यता; केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाची माहिती
Lav Aggrawal (PC - ANI)

Coronavirus: देशातील ईशान्य भागात वैद्यकीय उपकरणे (Medical Equipment) व आपत्कालीन वस्तू पुरवण्यासाठी खास मालवाहू विमाने (Exclusive Cargo Flights) चालविण्यास येणार आहेत. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने (Ministry of Health & Family Welfare) यासंदर्भात माहिती दिली आहे. आरोग्य मंत्रलयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल (Lav Aggrawal) यांनी याबाबत एएनआय वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे.

केंद्र सरकारने कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद केल्या होत्या. त्यानंतर केवळ अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या विमानांनाचं परवानगी देण्यात आली होती. सध्या संपूर्ण देशातील सर्व प्रकारच्या वाहतूक सेवा बंद आहेत. रविवारी भारतीय रेल्वेने अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी तसेच वैद्यकिय उपकरणांचा पुरवठा करण्यासाठी विशेष पार्सल गाड्या सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आज ईशान्य भागात जीवनावश्यक तसेच वैद्यकिय साहित्याचा पुरवठा करण्यासाठी काही खास विमानांना परवानगी देण्यात आली आहे. (हेही वाचा - उत्तर प्रदेश: स्थलांतरीत मजूरांना केमिकलयुक्त पाण्याने आंघोळ; प्रियंका गांधी यांच्याकडून सरकारवर टीका; पहा व्हिडिओ)

देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. या सर्व रुग्णांवर उपचार करण्यासाठी सरकार सर्वोतपरी प्रयत्न करत आहे. केंद्र सरकारने देशातील उत्पादकांना मास्क, व्हेंटिलेटर तसेच वैद्यकिय उपकरणांची निर्मिती करण्याची मागणी केली आहे. सरकारने देशातील विविध उत्पादकांना 40 हजारहून अधिक व्हेंटिलेटर तयार करण्यास सांगितले आहे. तसेच दुसरीकडे दररोज लाखोंच्या संख्येने मास्क तयार केले जात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार सज्ज आहे. परंतु, जनतेनेदेखील सरकारने केलेल्या सुचनांचे पालन करायला हवे.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारकडून लॉकडाऊन दरम्यान घराबाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, काही नागरिक या सुचनांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. सध्या देशात कोरोना बाधितांची संख्या 1 हजाराहून अधिक झाली आहे. आतापर्यंत देशात 30 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.