छत्तीसगड: दंतेवाडा जिल्ह्यात 'भाजप'च्या ताफ्यावर नक्षलवाद्यांचा हल्ला; आमदारासह 5 पोलिसांचा मृत्यू
Naxals attack BJP convoy in Dantewada (Photo Credits: ANI)

लोकसभा निवडणुकांच्या काही दिवस आधी छत्तीसगढचा नक्षलवादी परिसर दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी भाजप आमदारांच्या (BJP MLA) ताफ्यावर हल्ला केला आहे.  यामध्ये भाजपचे दंतेवाडाचे आमदार भीमा मंडावी (Bheema Mandavi) यांचा मृत्यू झाला आहे. आज संध्याकाळी हा हल्ला करण्यात आला, यासाठी माओवाद्यांनी आयईडीचा वापर केला आहे. भीमा हे ताफ्याच्या शेवटच्या गाडीमधून प्रवास करत होते, त्याच गाडीवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 5 पोलिसांचाही मृत्यू झाला आहे.

आयईडीच्या स्फोटानंतर नक्षलवाद्यांनी फायरिंगसुद्धा केली. हा लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी हल्ल्याचा कट रचल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी यापूर्वी दिली होती. यानंतर जवानांनी सुरक्षेत आणि बंदोबस्तातही वाढ केली, तरीही दंतेवाडा या ठिकाणी हा हल्ला झाला आहे. याधीही दंतेवाडा इथे माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे जवान शहीद झाले होते. दंतेवाडा हे छत्तीसगढमधील बस्तर लोकसभा मतदारसंघातील खेत्र आहे, इथे 11 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.