पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींना मोठा धक्का; तीन आमदारांसह, 60 नगरसेवकांचा भाजप पक्षात प्रवेश
3 BJP MLAs join BJP on Tuesday (Photo Credits: ANI)

मागच्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) अवघ्या 2 जागा जिंकलेल्या भाजप (BJP) ने यावेळी ममता दीदींच्या (Mamata Banerjee) गडाला चांगलेच खिंडार पाडले. भाजपच्या घवघवीत यशानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलत आहेत. आता ममता दीदींना अजून एक धक्का मिळाला आहे. आज, मंगळवारी तृणमूल काँग्रेसचे (TMC) दोन आणि माकप (CPM) चे 1 आमदार, तसेच 60 नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. दिल्लीमधील एका कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय (Kailash Vijayvargiya) यांच्या उपस्थितीमध्ये या आमदारांनी पक्षप्रवेश केला.

भाजपमध्ये सामील झालेल्या आमदारांमध्ये मुकुल रॉय यांचे पुत्र सुभ्रांशु रॉय (Subhrangshu Roy), तुष्क्रांति भट्टाचार्य आणि देवेंद्र रॉय यांचा समावेश आहे. तर सर्वाधिक म्हणजेच 24 नगरसेवक हे कंचरापारा, हलिशहर आणि नैहाती महानगरपालिकेचे आहेत. याबाबत बोलताना कैलाश विजयवर्गीय म्हणाले, ‘ये तो सिर्फ झांकी है, बंगालमध्ये जशा सात टप्प्यांमध्ये निवडणुका पार पडल्या तसेच सात टप्प्यात भाजपमध्ये लोक प्रवेश करतील. हा तर पहिला टप्पा आहे.’ (हेही वाचा: ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा? पक्षात अध्यक्षपद सांभाळायची इच्छा)

या निवडणुकीत भाजपने अतिशय उत्तम कामगिरी करत 18 जागा जिंकल्या आहेत, तर टीएमसीने 22 जागा. निवडणुकीनंतर आता भाजपकडून टीएमसीच्या अनेक नेत्यांना आपल्या पक्षात करण्याचा प्रयत्न सुरु आहे. यासाठी आधी टीएमसीमध्ये असणारे आणि नंतर भाजपमध्ये प्रवेश करणारे मुकुल रॉय यांची मदत घेतली जात आहे.

अशीच खेळी भाजप मध्यप्रदेश येथे खेळत असल्याचा आरोप कमलनाथ यांनी केला आहे. बीएसपीच्या आमदारांना 50-60 कोटी देऊन कॉंग्रेसला असलेला पाठींबा काढण्यास सांगितले जात आहे. महाराष्ट्रातही निवडणुकांच्या तोंडावर राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता 30 मे ला होणाऱ्या शपथविधीनंतर राधाकृष्ण विखे-पाटीलही काही आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.