नागरिकांची मोफत कोरोना चाचणी (Corona test) करण्यात यावी, या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका (Petition) दाखल करण्यात आली आहे. ज्येष्ठ वकील शशांक देव सुधी (Advocate Shashank Dev's) यांनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेत शशांक देव यांनी देशात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे केंद्र आणि सर्व राज्य सरकारांना कोरोना विषाणूची चाचणी मोफत करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने देशातील 50 हून अधिक खासगी लॅब्सना कोरोना चाचणी करण्यासाठी मंजुरी दिली आहे. कोरोना चाचणी करण्यासाठी या लॅब्समध्ये 4 हजार 500 रुपये आकारले जातात. यात दोन प्रकारच्या चाचण्या आहेत. त्यात स्क्रिनिंगसाठी 1500 रुपये आणि कन्फर्मेशनसाठी 3 हजार रुपये आकारले जातात. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना कोरोना चाचणी करणं परवड नाही. म्हणून शशांक देव यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. (हेही वाचा - LPG Cylinder च्या किंमतीमध्ये मुंबईसह देशभरात मोठी दर कपात; जाणून घ्या गॅस सिलेंडर च्या नव्या किंमती!)
देशात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या देशात 1200 हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच 50 पेक्षा जास्त जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. यासाठी त्यांनी पीएम केअर फंडची घोषणी केली आहे. कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी देशातील सर्वसामान्य नागरिक, उद्योजक, नेते मंडळी, कलाकार आदी धावून आले आहेत. याशिवाय देशातील विविध कंपन्यांनी कोट्यावधी रुपयांची मदत केली आहे.