LPG (Photo Credits: All India Radio News, Facebook)

LPG Cylinder Prices Reduced: देशभरामध्ये जनसामान्यांची नव्या आर्थिक वर्षाची सुरूवात दिलासादायक बातमीने झाली आहे. आज (1 एप्रिल) विना अनुदानित एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे. देशभरातील प्रमुख शहरांमध्ये 14.2 किलोच्या गॅस सिलेंडरच्या दरांमध्ये किमान 60 रूपयांची कपात जाहीर करण्यात आली आहे. Indian Oil Corporation Limited ने जाहीर केलेल्या माहितीनुसार, 14.2 kg च्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात दिल्लीत मध्ये 61.5 रूपये, कोलकत्ताध्ये 65 रूपये, मुंबईमध्ये 62 तर चैन्नईमध्ये 64.5 रूपयांची कपात जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे ही सर्वसामान्यांसाठी मोठी खूषखबर आहे. आंतरराष्ट्रिय बाजारात घसरणार्‍या कच्चा तेलाच्या किंमती, रूपयाच्या एक्सचेंज किंमतीवर हे गॅस सिलेंडरचे दर अवलंबून बदलत असतात.

मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात सातत्याने सहा वेळेस घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाढवल्यानंतर आता ही दुसर्‍यांदा झालेली दर कपात आहे. मागील महिन्यात विना अनुदानित एलपीजी गॅस सिलेंडरचे दर सुमारे 52.50 रूपयांनी देशभरातील प्रमुख शहरांमध्ये कमी करण्यात आले होते.

मुंबईमध्ये नव्या दरानुसार गॅस सिलेंडरची किंमत काय?

नव्या दरांनुसार आता मुंबईमध्ये 14.2 kg चा एलपीजी गॅस सिलेंडर Rs 714 (पूर्वीची किंमत Rs 776.5) तर 19 किलोचा गॅस सिलेंडर 1,234.5 रूपयांमध्ये उपलब्ध होणार आहे.

सध्या जगभरात कोरोना व्हायरसचं थैमान असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुड ऑईलच्या किंमती घसरत आहेत. 2002 पासुनच्या निच्चांकावर सध्या क्रुड ऑईलचा दर येऊन पोहचला आहे. परिणामी मागील 15 दिवसांच्यापेक्षा अधिक काळापासून पेट्रोल, डिझेलच्या किंमतीदेखील स्थिर आहेत.