पंतप्रधान नरेंद्र मोदी (Photo Credits:ANI)

दिवाळी तोंडावर आली असताना, देशातील व्यावसायिकांसाठी अतिशय आनंदाच्या बातमीची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम स्वरुपांच्या व्यवसायासाठी (Micro, Small and Medium Enterprises) फक्त 59 मिनिटात 1 कोटी रुपयापर्यंत कर्ज मंजूर करण्याची महत्वपूर्ण घोषणा आज करण्यात आली. केंद्र सरकारकडून देशातील व्यावसायिकांसाठी हे दिवाळी गिफ्ट असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना ही नव्या कर्ज योजनेची घोषणा केली

देशातील विविध क्षेत्रातील उद्योगांना चालना देण्यासाठी सरकारकडून 12 महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामुळे सूक्ष्म, छोटया आणि मध्यम स्वरुपाच्या व्यवसायांना सहजतेने कर्ज उपलब्ध होईल, ज्यामुळे रोजगार वाढीला चालना मिळेल असे मोदी म्हणाले. MSME किंवा छोट्या उद्योगांवरच भारतीय जनता अवलंबून आहे. त्यामुळे अशा प्रकारचे उद्योग भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये फार मोठी भूमिका बजावतात. म्हणूनच मोदींच्या या निर्णयामुळे आता देशातील व्यवसायाचे चित्र पूर्ण पालटून जाईल यात शंका नाही.

सरकारच्या या योजनेअंतर्गत देशातील कोणत्याही कानाकोपऱ्या असलेल्या व्यक्तीला, कोणत्याही वेळी जीएसटी नोंदणीकृत उद्योगांसाठी 1 तासामध्ये तब्बल 1 करोड रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होणार आहे. आणि या कर्जावरील व्याजदरात 2 टक्के सूटही देण्यात आली आहे. तसेच इथूनपुढे सरकार कंपन्या जे सामान विकत घेतील त्यातील 25 टक्के हिस्सा हा देशातील लघु उद्योगांचा असेल तर त्यातील 3 टक्के हिस्सा हा महिला व्यावसायिकांचा असेल, असे देखील पंतप्रधानांनी यावेळी घोषित केले.

देशातील 100 जिल्ह्यात पुढचे 100 दिवस हा कार्यक्रम चालणार आहे. देशाच्या जीडीपीमध्ये MSME सेक्टरचे 30 टक्के योगदान आहे. या सेक्टरचे देशभरात विशाल जाळे पसरले असून 6.3. कोटीपेक्षा जास्त MSME युनिट देशात कार्यरत असून 11.1 कोटी लोकांना यातून रोजगार मिळतो असे मोदींनी सांगितले.