Long Queue Outside Liquor Shop (Photo Credits: Twitter/@Yatharth9815)

Lockdown: देशातील विविध राज्यातील ग्रीन झोनमध्ये (Green Zone) दारूच्या दुकानांना (Liquor Shop) परवानगी देण्यात आली आहे. परंतु, नागरिकांना मद्य खरेदी करताना सोशल डिस्टंसिंगचा फज्जा पाडला आहे. दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र तसेच इतर राज्यात दारूच्या दुकानासमोर तळीरामांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यावेळी तळीरामांना सोशल डिस्टंसिंगचा (Social Distance) विसर पडला आहे. दारूच्या दुकानांसमोरील गर्दी हटवण्यासाठी पोलिसांना घटनास्थळी जाऊन सोशल डिस्टंसिंगची आठवण करून द्यावी लागली.

देशातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात आणखी 2 आठवड्यांसाठी लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. त्यामुळे देशात 17 मे पर्यंत लॉकडाऊन असणार आहे. केंद्र सरकारने रेड झोनमध्ये कडक निर्बंध घातले आहेत. तर ग्रीन झोनमध्ये उद्योगधंदे सुरू करण्यास परवानगी दिली आहे. केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात केवळ ग्रीन झोनमध्ये दारुची दुकाने उघडण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र, दारुची दुकाने उघडण्यासाठी सरकारने काही अटी घातल्या आहेत. परंतु, नागरिकांकडून या नियमांचे उल्लंघन होतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. (हेही वाचा - Lockdown: घरी परतणाऱ्या स्थलांतरीत कामगारांच्या रेल्वे तिकीटाचा 85% खर्च केंद्र सरकार, 15% राज्य सरकार उचलणार; खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचा ट्विटरद्वारे दावा)

दरम्यान, दिल्लीतील देश बंधू गुप्ता रोड येथील मद्य दुकानाबाहेर एक किलोमीटरपेक्षा जास्त लांब रांग दिसून आली. लोकांनी सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन केल्याने पोलिसांनी काश्मेरी गेटमधील वाईन शॉपच्या बाहेर सौम्य लाठीचार्ज केला.

कर्नाटकमध्ये बंगलोर आणि हुबलीसह राज्यातील विविध भागात दारूच्या दुकानांच्या बाहेर तळीरामांनी गर्दी केली होती. कर्नाटकमधील मद्य दुकान सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत खुले ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

याशिवाय महाराष्ट्रात मुंबईत दारूच्या दुकानांच्या बाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नवी मुंबईच्या वाशी परिसरात नागरिकांनी दारूसाठी गर्दी केली आहे. देशभरात 24 मार्चपासून दारूची दुकाने बंद आहेत. भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत देशात 42,533 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.