आपल्या वर्दीची ताकद वाढण्याऐवजी आपल्या गणवेशाचा अभिमान बाळगा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तरुण IPS अधिकाऱ्यांना आवाहन
PM Narendra Modi interacts with IPS Officer Trainees during Dikshant Parade (PC - ANI)

आपल्या वर्दीची ताकद वाढण्याऐवजी आपल्या गणवेशाचा (Police Uniform) अभिमान बाळगा. खाकी गणवेशाचा आदर कधीही गमावू नका, असं आवाहन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमी, हैदराबाद (Sardar Vallabhbhai Patel National Police Academy, Hyderabad) येथील तरुण आयपीएस अधिकाऱ्यांना (Young IPS Officers) आपल्या व्हर्च्युअल भाषणात केलं आहे.

कोरोना संकट (Corona Crisis) काळात पोलिसांनी केलेल्या चांगल्या कामांमुळे खाकी वर्दीचा मानवी चेहरा जनतेच्या मनावर कोरला गेला, अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. (हेही वाचा - India-China Border Tension: भारत-चीन सीमेवरील परिस्थिती तणावपूर्ण मात्र कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी जवान सज्ज- लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे)

योग आणि प्राणायाम तणावाखाली काम करणाऱ्यांसाठी चांगले आहे. आपण मनापासून कोणतेही काम केल्यास आपल्याला नेहमीच फायदा होईल. कितीही काम असले, तरी आपणास कधीही त्याचा तणाव वाटणार नाही, असं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितलं. पोलिसांचे क्षेत्र असे आहे की, त्यात अनेकदा बर्‍याच अनपेक्षित गोष्टी घडतात. मात्र, त्यासाठी आपण नेहमी तयार रहायला हवं. यासाठी नियमित प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे. याशिवाय वेगवेगळ्या विषयांवर स्थानिक लोकांशी संवाद साधल्यास आपल्या कार्यावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल, असा सल्लादेखील यावेळी नरेंद्र मोदी यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिला.

कोरोनामुळे नवनिर्वाचीत IPS अधिकाऱ्यांना प्रत्यक्षात भेटता आलं नाही, अशी खंतदेखील यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. यावर्षी एकूण 131 आयपीएस अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. यात 28 महिला अधिकाऱ्यांचादेखील समावेश आहे.