Supreme Court | (File Image)

Farmers Protest: कृषी कायद्याच्या मुद्द्यावरून तसेच गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीत चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाच्या नजरा 26 जानेवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाकडे लागल्या आहेत. या दिवशी दिल्लीत शेतकरी मोठी ट्रॅक्टर रॅली (Tractor Rally) काढणार आहेत. मात्र, या रॅलीस दिल्ली पोलिसांनी विरोध दर्शविला आहे. आज यासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीत सरन्यायाधीशांनी म्हटलं की, मोर्चे किंवा आंदोलनास परवानगी देणे हे कोर्टाचे नव्हे, तर पोलिसांचे काम आहे. दिल्लीत कोणाला प्रवेश द्यायचा हे ठरविण्याचं काम पोलिसांचं आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढणार असल्याचे शेतकऱ्यांनी जाहीर केले आहे. ही ट्रॅक्टर रॅली दिल्लीतील रिंग रोडवर निघणार आहे. परंतु, दिल्ली पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा हवाला देत यास विरोध दर्शवला होता. त्यानंतर शेतकरी संघटनांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. (वाचा - Farmers Protest: दिल्लीत येणाऱ्या शेतकऱ्यांची अडवणूक करण्यासह दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली जातेय, संजय राऊत यांची केंद्र सरकारवर टीका)

दरम्यान, आज या प्रकरणाची सुनावणी करताना सरन्यायाधीशांनी म्हटलं की, रामलीला मैदानावर परवानगी देण्याबाबत पोलिसांनी निर्णय घ्यावा. तसेच, प्रजासत्ताक दिनी किती लोक शहरात येतील याचादेखील निर्णय पोलिस घेतील. तथापि, सॉलिसिटर जनरलने प्रजासत्ताक दिनाचा हवाला देत कोर्टाच्या निर्देशासाठी अपील केल्याने आता बुधवारी या प्रकरणाची सविस्तर सुनावणी होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी शेतकरी आंदोलनासंदर्भात सुनावणी केली होती. कोर्टाने या प्रकरणी एक समिती गठीत केली आहे. ही समिती कृषी कायद्याबाबत शेतकरी आणि सरकारमधील वाद मिटविण्यासाठी काम करेल. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे.