IRCTC Gift For Pilgrims: भारतीय रेल्वेची उपकंपनी असणारी इंडियन कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) फेब्रुवारी आणि मार्चमध्ये गुजरातमधील राजकोट येथून यात्रेकरूंसाठी 4 विशेष गाड्या चालवणार आहे. आयआरसीटीसी वेस्टर्न झोन ग्रुपचे सरव्यवस्थापक राहुल हिमालयन यांनी सांगितलं की, चारही गाड्या राजकोट येथून धावतील. फेब्रुवारीपासून यात्रेकरूंसाठी दोन विशेष गाड्या सुरू होतील. नाशिक, औरंगाबाद, परळी, कुर्नूल, रामेश्वरम, मदुराई आणि कन्याकुमारी ला कव्हर करणारी दक्षिण दर्शन तीर्थ स्पेशल ट्रेन 14 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी या कालावधीत धावेल.
हिमालयन यांनी सांगितलं की, 27 फेब्रुवारी ते 8 मार्च या कालावधीत नमामि गंगे तीर्थयात्रा स्पेशल ट्रेन वाराणसी, गया, कोलकाता, गंगा सागर आणि पुरी या ठिकाणांना कव्हर करेल. भारत दर्शन गाड्या मार्चपासून सुरू होतील. मथुरा, हरिद्वार, ऋषिकेश, अमृतसर आणि वैष्णोदेवी या ठिकाणांना कव्हर करणारी कुंभ हरिद्वार भारत दर्शन ट्रेन 6 मार्च ते 14 मार्च दरम्यान धावेल. याशिवाय 20 मार्च 31 दरम्यान, रामेश्वरम, मदुरै, कन्याकुमारी, त्रिवेंद्रम, गुरुवायूर, तिरुपती आणि मैसूर या ठिकाणाहून दक्षिण भारत यात्रा भारत दर्शन ट्रेन धावणार आहे. (वाचा - Indian Railways: विद्यार्थिनीची परीक्षा चुकू नये म्हणून भारतीय रेल्वेने दाखवली तत्परता; लेट झालेल्या ट्रेनचा फुल स्पीड वाढवून पोहचली ठरल्या वेळेत)
याव्यतिरिक्त, आयआरसीटीसी आपली कॉर्पोरेट तेजस एक्स्प्रेस ट्रेन अहमदाबाद-मुंबई मार्गावर 14 फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू करणार आहे. आयआरसीटीसीचे पर्यटन सह-सरव्यवस्थापक वायुनंदन शुक्ला यांनी सांगितलं की, कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे तेजस ट्रेनचे काम गेल्या वर्षी मार्चमध्ये थांबविण्यात आले होते. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आयआरसीटीसीने पुन्हा एकदा या सेवा पुन्हा सुरू केल्या. परंतु, आता पुन्हा एकदा आम्ही तेजस एक्स्प्रेस ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही ट्रेन शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवारी धावेल. या खास गाड्यांच्या तिकिटांच्या किंमतींमध्ये प्रवास, भोजन, लोकल बस वाहतूक, धर्मशाळा अकमाडेशन, टूर गाईड्स आणि हाउसकीपिंग खर्च यांचा समावेश आहे.