Sudha Murty Nominated To Rajya Sabha: इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर नियुक्ती; पंतप्रधान मोदींनी ट्विट करत दिली माहिती
PM Narendra Modi, Sudha Murty (PC - X/ANI)

Sudha Murty Nominated To Rajya Sabha: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राष्ट्रपतींच्या वतीने इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांच्या पत्नी आणि सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सुधा मूर्ती (Sudha Murty) यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात पंतप्रधानांनी स्वत: ट्विट करत माहिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनीचं औचित्य साधून सुधा मूर्ती यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मूर्ती यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना, पंतप्रधान मोदींनी सामाजिक कार्य, परोपकार आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचे कौतुक केले.

पीएम मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'भारताच्या राष्ट्रपतींनी सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर नियुक्ती केल्याचा मला आनंद आहे. सामाजिक कार्य, परोपकार आणि शिक्षण यासह विविध क्षेत्रात सुधाजींचे योगदान खूप मोठे आणि प्रेरणादायी आहे. त्यांची राज्यसभेतील उपस्थिती खूप मोठी आहे. आमच्यासाठी हा सन्मान आहे. नारी शक्तीचा एक शक्तिशाली करार, आपल्या राष्ट्राचे नशीब घडवण्यासाठी महिलांच्या सामर्थ्याचे उदाहरण देते. मी त्यांना फलदायी संसदीय कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो.' (हेही वाचा - Lok Sabha Election 2024: विद्यमान भाजपा खासदारांचा पत्ता कट? राजकीय वर्तुळातच चर्चा, यादीही व्हायरल)

कोण आहेत सुधा मूर्ती?

सुधा मूर्ती या प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका आहेत. सुधा मूर्ती यांनी आठ कादंबऱ्या लिहिल्या आहेत. भारतातील सर्वात मोठी ऑटो मॅन्युफॅक्चरिंग इंजिनीअरिंग आणि लोकोमोटिव्ह कंपनी टेल्कोमध्ये काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला अभियंता आहेत. सुधा मूर्ती या इन्फोसिस फाऊंडेशनचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आहेत. सुधा मूर्ती यांना मुलगी अक्षता मूर्ती आणि मुलगा रोहन मूर्ती अशी दोन मुले आहेत. अक्षता नारायण मूर्ती ही यूकेस्थित भारतीय फॅशन डिझायनर आणि यूकेच्या पंतप्रधानांची पत्नी आहे. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे सुधा मूर्ती यांचे जावई आहेत. रोहन मूर्ती हे मूर्ती क्लासिकल लायब्ररी ऑफ इंडिया तसेच सोरोको या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन स्टार्टअपचे संस्थापक आहेत. (हेही  वाचा - Lok Sabha Election 2024 : उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघातून काँग्रेसकडून 'बड्या' अभिनेत्याला संधी मिळण्याची शक्यता)

सुधा मूर्ती यांचे शिक्षण - 

सुधा मूर्ती यांचा जन्म 19 ऑगस्ट 1950 रोजी उत्तर कर्नाटकातील शिगाव येथे झाला. सुधाच्या वडिलांचे नाव आर.एच. कुलकर्णी आणि आईचे नाव विमला कुलकर्णी आहे. त्यांनी हुबळीच्या BVB कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली. 150 विद्यार्थ्यांमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवणाऱ्या सुधा या पहिल्या महिला होत्या. वर्गात पहिला क्रमांक मिळावल्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना पदक देऊन गौरविले. नंतर त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. सुधा मूर्ती या भारतातील सर्वात मोठ्या वाहन उत्पादक कंपनी Telco मध्ये काम करणाऱ्या पहिल्या महिला अभियंता ठरल्या. पुण्यात विकास अभियंता म्हणून काम केल्यानंतर त्यांनी मुंबई आणि जमशेदपूर येथेही काम केले.