President Ram Nath Kovind. | (Photo Credits: DD News)

President Ramnath Kovind Speech: अवघा देश 73 वा स्वातंत्र्य दिन (Independence Day) साजरा करण्यासाठी उत्सुक आहे. उद्याचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी सर्वात मोठा सण असणार आहे. देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या या दिवसाचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. आज, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. भारताचे राष्ट्रपती स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून भाषण करतात. गेली अनेक वर्षे ही परंपरा सुरु आहे. या वेळी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind)  यांनी सुद्धा आज (बुधवार, 14 ऑगस्ट 2019) देशाला उद्देशून भाषण केले. राष्ट्रपतींच्या भाषणात सरकारचे धोरण, सरकारने केलेले काम, देशाची मुल्ये आणि भविष्याबद्दलच्या योजनांचा घोषवारा होता.

राष्ट्रपती रामनाथ  कोविंद यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे –

‘आजचा दिवस सर्व भारतीयांसाठी महत्वाचा आहे. मग तो भारतात राहणारा असो वा भारताबाहेर राहणारा असो. आजच्या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी झटलेल्या, प्राणांची आहुती देणाऱ्या त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना सलाम’ असे म्हणत राष्ट्रपतींनी आपले भाषण सुरु केले. पुढे त्यांनी महात्मा गांधी यांच्या येणाऱ्या 150 व्या जयंतीबद्दल भाष्य करत गांधीजींच्या विचारांचे महत्व कथन केले. त्यानंतर त्यांनी गुरुनानक देवजी यांच्या 550 व्या जयंतीनिमित शुभेच्छा दिल्या.

पुढे त्यांनी जम्मू काश्मीरबाबतीत असलेले कलम 370 हटवल्याबद्दल आपले विचार व्यक्त केले. या निर्णयामुळे जम्मू काश्मीरची प्रगती होईल असा विश्वासही व्यक्त केला. त्यानंतर तीन तलाख हा मुस्लिम स्त्रियांसाठी कसा वरदान ठरेल त्याबद्दल विचार व्यक्त केले.

त्यानंतर त्यांनी भारत सरकारने गेल्या 72 वर्षांमध्ये केलेली प्रगती कथन केली. यामध्ये रस्ते, इतर दळणवळण सोयी, वीज, शौचालये, आरोग्य सुविधा, शैक्षणिक सुविधा, पाणी अशा अनेक गोष्टींचा समावेश होता. या सर्व सुविधांचा वापर प्रत्येक भारतीयाने करायला हवा असे त्यांनी सांगितले. या सर्वांमध्ये प्रत्येक भारतीयाने इतरांप्रती योग्य व्यवहार ठेवला पाहिजे, प्रत्येकाशी नीट बोलणे, वागणे, सलोख्याने राहणे या गोष्टीही महत्वाच्या आहेत असे राष्ट्रपती म्हणाले. थोडक्यात आपली मुल्ये, आपले आदर्श यांच्या जोरावर सर्वांना एकत्र घेऊन भारताने कमी वेळात खूप मोठी प्रगती केली आहे. याचे श्रेय सरकार आणि नागरिकांना जाते असे राष्ट्रपतींचे म्हणणे ठरले.

यंदा पुन्हा एकदा नव्यानेच अस्तित्वात आलेल्या मोदी सरकारने गेल्या काही काळात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. जसे की, जम्मू काश्मीरमधील 370 कलम हटवणे, तीन तलाख विधेयक अशी अनेक विधेयके संसदेत चर्चेला आली आणि ती मंजूरही झाली. पण, त्यावर संसदेत आणि संसदेबाहेर जोरदार टीकाही झाली. या पार्श्वभूमिवर राष्ट्रपती कोविंद यांनी आपल्या भाषणात केलेले भाष्य महत्वाचे ठरले.